‘मी तसं बोललो नव्हतो’, शरद पवार यांचा घुमजाव, ‘मूळ पवार आणि बाहेरचे पवार’ वक्तव्यावर स्पष्टीकरण
"महिलांच्या संबंधित काही इशू असेल तर मला असं वाटतं की, या देशात महिलांच्या आरक्षणाचा पहिला निर्णय घेणारा मी राज्यातला पहिला मुख्यमंत्री होतो. शासकीय सेवेत आरक्षणाचा निर्णय माझा होता. केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना लष्करात मुलींना समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय हा माझा होता. असे अनेक निर्णय आहेत", अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
केंद्रीय माजी मंत्री शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालेला. मूळ पवार आणि बाहेरचे पवार यांच्यात फरक, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर आज शरद पवार यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसेच आपण तसं वक्तव्य केलंच नव्हतं, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
“मी तसं बोललेलो नव्हतो. मी जे बोललो होतो, पत्रकाराने विचारलं, अजित पवार यांनी काही भाषण केलं होतं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की, जनतेनं मला निवडून दिलं. त्यांना स्वत:ला निवडून दिलं, ताईला निवडून दिलं, आता सूनेला निवडून द्या. त्यापुढे त्यांनी आणखी काही वाक्य वापरलं. त्याच्या संबंधित मी फक्त स्पष्टीकरण केलं. यापेक्षा वेगळा काही अर्थ काढण्याची गरज नाही”, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं.
‘महिलांसाठी आरक्षणाचा निर्णय घेणारा मी पहिला मुख्यमंत्री’
“महिलांच्या संबंधित काही इशू असेल तर मला असं वाटतं की, या देशात महिलांच्या आरक्षणाचा पहिला निर्णय घेणारा मी राज्यातला पहिला मुख्यमंत्री होतो. शासकीय सेवेत आरक्षणाचा निर्णय माझा होता. केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना लष्करात मुलींना समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय हा माझा होता. असे अनेक निर्णय आहेत, ज्या निर्णयांमध्ये महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल याची काळजी घेण्याचा काळजी मी घेतली. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याला सार्थ करण्यासाठी, त्याचा पाठपुरावा केला”, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.
बारामतीत पवार विरुद्ध पवार
बारामतीत राजकीय वातावरण तापलं आहे. कारण या मतदारसंघात पवार कुटुंबातले दोन सदस्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांच्या गटाकडून सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. तर शरद पवार यांच्याकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे निवडणूक लढवत आहेत. एकाच कुटुंबातले दोन जण एकाच मतदारसंघात समोरासमोर निवडणूक लढवत असल्याने या निवडणुकीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. ही निवडणूक दोन्ही पवारांसाठी खूप प्रतिष्ठेची मानली जात आहे.