दणके आणि हादरे… शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच राजीनामा सत्र सुरू; जिल्हाध्यक्षांपासून सर्वांचेच राजीनामे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद सोडलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवावी लागेल असं विधान केलं. त्यानंतर पवार यांनी स्वत:च पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला. पवारांच्या या धक्कातंत्रामुळे भल्याभल्यांची झोप उडाली आहे. शरद पवार यांचा हा निर्णय पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनाही अनपेक्षित होता. त्यामुळे नेते आणि कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत. पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावर कार्यकर्ते आणि नेत्यांकडून दबाव वाढत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करून पवार यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. पण पवार काही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता थेट राजीनाम्यांचं सत्र सुरू केलं आहे. पवार नाही तर आम्हीही पदावर नको, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
लोक माझे सांगाती या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी मोठा निर्णय जाहीर केला. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे कार्यकर्ते हवालदिल झाले. सर्वांनीच शरद पवार यांना गराडा घालून त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. अनेक कार्यकर्ते रडले. नेत्यांनाही अश्रू अनावर झाले. काही कार्यकर्त्यांनी तर ठिय्या आंदोलन सुरू केलं. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे कार्यकर्ते प्रचंड निराश झाले होते. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
पुण्यात 125 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
पुण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीतील 125 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, युवक शहराध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. दोन दिवस वाट बघणार. पवार साहेबांनी निर्णय मागे घेतला नाही तर महेबुब शेखही राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. पदाधिकाऱ्यांचे राजीनामे यायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 125 लोकांचे राजीनामे आले आहेत. धाराशीव जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. बिराजदार यांनी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्षाचा राजीनामा सोपवला आहे. त्यांच्यासोबत 32 जणांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं.
अर्धा डझन जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
शरद पवार यांनी राजीनामा परत घ्यावा म्हणून राष्ट्रवादीच्या अर्धा डझन जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. अजूनही राजीनाम्याचं सत्र सुरू आहे. आतापर्यंत पुणे, बुलढाणा, धाराशीव, अमरावती, चंद्रपूर, सांगली आणि पनवेलच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. शरद पवार यांनी 5 मेपर्यंत आपला निर्णय मागे घ्यावा, असं आवाहन मेहबूब शेख यांनी केलं आहे. तर पवारांनी राजीनामा मागे नाही घेतला तर आंदोलन करू, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.