दोन मिनिटांच्या संवादात शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना समजवले, दिले हे आश्वासन
ncp sharad pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर कार्यकर्त्यांची दोन दिवसांपासून अनेक जण समजूत घालत आहे. सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी समजूत घातली. अखेरी आज शरद पवार स्वत: कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यामध्ये काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून राजीनामा मागे घेण्याची मागणी केली आहे. अखेर शरद पवार कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वाय.बी.चव्हाण सेंटरमधून बाहेर येत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
दोन मिनिटे साधला संवाद
दोन दिवसांपासून वाय.बी.सेंटरच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न अनेक पदाधिकाऱ्यांनी केला. सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी समजूत घातली. परंतु कार्यकर्ते ऐकत नसल्याने अखेरी शरद पवार यांनी संवाद साधला. अगदी मोजक्या शब्दांत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. ते म्हणाले, तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित करणार नाही. दोन दिवसानंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही. आपण एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ. उद्या राष्ट्रवादीच्या समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीच्या निर्णयानंतर आपण निर्णय घेऊ.
आधी सुप्रिया सुळे यांनी केला प्रयत्न
उपोषण आणि आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आधी सुप्रिया सुळे यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. उद्या सकाळी बैठक होणार आहे. तो पर्यंत वाट बघू नाहीतर पुन्हा तुम्ही बसा असं सांगत सुप्रिया सुळे यांनी उपोषण कर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. पुढे जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार यांच्याशी पाच जण चर्चेला चला म्हणून सांगितले. मात्र, आता चर्चा नको साहेबच आम्हाला अध्यक्ष म्हणून हवे आहेत, असा हट्ट करत सुप्रिया सुळे यांनाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे पदाधिकारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने सुप्रिया सुळे यांनी तिथून काढता पाय घेतला.