RajyaSabha Election:शरद पवारांच्या खेळीमुळे मविआचे तीन खासदार सुरक्षित होणार, आमचं मतदान सुरक्षित, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मतपत्रिका दुसऱ्याला दाखवल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. अशा स्थितीत पुढे काय होणार हा प्रश्न आहे. अशा स्थितीत शरद पवारांची मतांची खेळीच मविआच्या उमेदवारांना वाचवेल अशी शक्यता आहे.
मुंबई – राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress-NCP)तीन मतांबाबत भाजपानं घेतलेल्या आक्षेपानंतर आता ही मतमोजणी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता या प्रकरणी भाजपाच्या (BJP) शिष्ठमंडळाने थेट दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट (election commission)घेतली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेही या व्हिडीओ क्लिप्स दिल्लीला मागवल्या आहेत. राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यातील मतदानाबाबत भाजपानं तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत याबाबतचा मतमोजणीच्या परवानगीचा मेल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य निवडमूक आयोगाकडे येणार नाही तोपर्यंत मतमोजणी सुरु होणार नाहीये. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये असवस्थता पसरली आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मतपत्रिका दुसऱ्याला दाखवल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. अशा स्थितीत पुढे काय होणार हा प्रश्न आहे. अशा स्थितीत शरद पवारांची मतांची खेळीच मविआच्या उमेदवारांना वाचवेल अशी शक्यता आहे.
शरद पवारांची खेळीच वाचवणार
शरद पवारांनी काल रात्रीच राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी ४४ मतांचा कोटा निश्चित केलेला होता. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापल्याचेही सांगण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेसनेही आपल्या उमेदवारासाठी ४४ मतांचा कोटा निश्चित केल्याचे सांगण्यात आले. मतदानावेळी दोन-तीन मते बाद ठरण्याची किंवा आक्षेप घेतला जाईल अशी शंका शरद पवारांना आधीपासूनच असल्याने पवारांनी प्रत्येक उमेदवारासाठी सुमारे ४ मते जास्त देण्याचा निर्णय घेतला होता. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी मिळणार नाही, हेही कदाचित शरद पवारांना माहित असावे. त्यामुळे प्रफुल्ल पवार यांचे मतदान सुरक्षित करण्यासाठी त्यांनी ४४ मतांचा कोटा वापरला असण्याची शक्यता आहे. मलिक, देशमुखांव्यतिरिक्तही ही आक्षेप घेतलेली तिन्ही मते बाद ठरली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एकेक खासदार निश्चित निवडून येणार आहे, याचे श्रेय शरद पवारांच्या खेळीलाच जाईल. त्यामुळे या मुद्द्यावर सकाळी संतापलेल्या शिवसेनेची भूमिका मवाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमचे मतदान सुरक्षित- जितेंद्र आव्हाड
या सगळ्या वादानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनीही पक्षाच्या खासदाराची आवश्यक मते सुरक्षित असल्याचे विधान केले आहे. जर मतमोजणी रद्द झाली तर काय, या प्रश्नावर पुढे काय ते बघू असेही त्यांनी सांगितले आहे. याचाच अर्थ राष्ट्रवादीच्या एका खासदारासाठीची आवश्यक मते उमेदवाराला मिळाली आहेत, याचा विश्वास त्यांना आणि पक्षाला आहे. प्रत्येक उमेदवाराला कोट्यापेक्षा सुमारे चार मते जास्त देण्यात आल्याने, उमेदवार निश्चित निवडून येईल हे निश्चित आहे.
संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरस
महाविकास आघाडीचे तीन खासदार जिंकून येणार हे नक्की असले तरी सहाव्या जागेसाठी चांगलीच चुरस होईल अशी शक्यता आहे. आता मविआच्या बाजूने असलेल्या अपक्ष आणि छोट्या पक्षांनी किती प्रामाणिकपणे संजय पवार यांना मतदान केले आहे, यावर त्यांचा विजय अवलंबून असणार आहे. अटीतटीच्या या लढतीत निकालाला आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे.