आयारामांच्या भरवश्यावर ठाकरे यांची शिवसेना, शीतल म्हात्रे यांनी यादीच दिली; बघा कोण कुठून आलंय?
शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला डिवचले आहे. ठाकरे गटातील जे महत्त्वाचे नेते आहेत, तेच मुळात इतर पक्षातून आल्याची टीका म्हात्रे यांनी केली आहे. इतर पक्षातून आलेल्या या नेत्यांची यादीही म्हात्रे यांनी पोस्ट केली आहे.
मुंबई : शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. एका गटाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत तर दुसऱ्या गटाचं नेतृत्व हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलेलं आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटातील पदाधिकारी, नेते आणि मूळ शिवसैनिकांची शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. ठाकरे गटात अजूनही काही मातब्बर नेते आहेत. पण ते सर्व इतर पक्षातून आलेले आयाराम आहेत. अशा आयारामांच्या भवरश्यावरच उद्धव ठाकरे आपला पक्ष पुढे नेताना दिसत आहेत. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटातील या आयारामांची एक यादीच दिली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ठाकरे गटातील आयारामांची यादी दिली आहे. कोण कोणत्या पक्षातून ठाकरे गटात आलाय आणि सध्या त्यांच्याकडे काय जबाबादारी आहे याची माहितीच शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. तसेच ही यादी देतानाच खोचक कमेंटही केली आहे.
ठाकरे गटाचे निष्ठावंत सैनिक… शीतल म्हात्रेंनी दिलेली यादी
सचिन अहिर- राष्ट्रवादी
सुषमा अंधारे – राष्ट्रवादी
भास्कर जाधव – राष्ट्रवादी
वैभव नाईक – काँग्रेस
मनिषा कायंदे – भाजप
प्रियंका चतुर्वेदी – काँग्रेस
संजना घाडी – मनसे
राहुल कानाल – काँग्रेस
साईनाथ दुर्गे – मनसे
ही यादी दिल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी अजून कोण उरलंय? असा सवालही केला आहे.
नेटकऱ्यांकडून ट्रोल
शीतल म्हात्रे यांनी ही यादी जाहीर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांनाच ट्रोल केलं आहे. अब्दुल सत्तार काका कुठून आलेत? असा सवाल एकाने विचारला आहे. तुमच्या मित्र पक्षात तर अर्धी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे, असा चिमटा दुसऱ्याने काढला आहे. एकाने तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे भाजप युवा मोर्चातून आल्याचं म्हटलं आहे. आणखी एकाने तर दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, प्रकाश सुर्वे, उदय सामंत आणि तुम्ही सुद्धा… अजून नावे हवीत का? असा सवाल केला आहे.