Ajit Pawar : शिंदे – फडणवीसांच्या हातात जास्त काही नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले अजित पवार?
अधिवेशन आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार या मुद्द्यावरुन शिंदे- फडणवीस सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. राज्यात सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांना नियमांपेक्षा जास्त मदत देण्याची गरज असल्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis)हातात मंत्रिमंडळाचे फारसे काही दिसत नसून, दिल्लीतून जोपर्यंत हिरवा झेंडा मिळत नाही, तोपर्यंत हे काही करु शकत नाहीत, असे दिसत असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील अतिवृष्टी, कारभार यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. राज्यात अतिवृष्टीची स्थिती आहे, शेतकरी अडचणीत आहेत, अशा स्थितीत सरकारने तातडीने यावर उपाययोजना करायला हव्यात. तातडीने अधिवेशन बोलावण्याची गरज आहे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. बहुमताचं सरकार असतानाही राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अशा स्थितीत राज्य सरकारचा कारभार सुरळीत पार पाडण्यासाठी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, हा राज्याचा अपमान असल्याची टीका त्यांनी केली आहे. अधिवेशन आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार या मुद्द्यावरुन शिंदे- फडणवीस सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. राज्यात सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांना नियमांपेक्षा जास्त मदत देण्याची गरज असल्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.
शिंदे फडणवीसांच्या हातात फारसं काही नाही
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत, त्यात गैर काही नाही, मात्र राज्याचे प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. पुरासारख्या परिस्थितीमध्ये पालकमंत्री यांचे काम अत्यंत महत्त्वाचे असते. अशा स्थितीत मात्र इतरांना त्रास देऊ नये म्हणून शिंदे फडणवीस हे दोघेच सरकार चालवत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या हातात फारसे काही दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत जाऊन जोपर्यंत तिथून हिरवा झेंडा मिळत नाही, तोपर्यंत हे काही करु शकत नाही असे दिसत असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
मविआ सरकारच्या कामांना स्थगिती का?
शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने गेल्या सरकारच्या कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे, यावर अजित पवार यांनी टीका केली आहे. दे दोघे काही सत्तेचा ताम्रपट घेून जन्माला आले आहेत का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे कामही थांबवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे योग्य नसल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.