…आता कळालं असेल, बळी नेमका कोणाचा गेलाय, शिंदे गटाने गुवाहाटीतून संजय राऊताना केलं टार्गेट…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आणि गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या आशिर्वादामुळे राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना-भाजप युतीचं सरकार आल्याचे शिंदे गटाच्या आमदारांनी सांगितले.
गुवाहाटीः शिवसेनेतून बंडखोरी करून मुंबई-सूरत-गुवाहाटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करून सत्तांतर घडवून आणणाऱ्या शिंदे गटाने आज पुन्हा गुवाहाटीचा दौरा केला आहे. त्यावरून वेगवेगळी मतमतांतरे व्यक्त होत असली तरी शिंदे गटातील आममदारांनी मात्र सत्ता स्थापन झाली म्हणून आम्ही नवस फेडायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत आज आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आम्ही शिवसेना आणि भाजपच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे अकरा शक्तीपिठामधील एक असणारे हे कामाख्या देवीच्या दर्शनाला आम्ही आलो असल्याचेही योगेश कदम यांनी सांगितले.
शिवसेनेतून बंडखोरी करून ज्यावेळी 40 आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली होती.
त्यावेळी त्यांनी चाळीस रेड्यांचा तिथे बळी दिला जातो अशी खरमरीत टीकाही संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली होती. त्यामुळे आज गुवाहाटीचा दौरा करणाऱ्या आमदार योगेश कदम यांनी सडतोड उत्तर दिले आहे.
आता ठाकरे गटाला समजले असेल बळी नक्की कोणाचा गेला आहे आणि वैचारिक मृ्त्यू कोणाचा झाला आहे हेही समजलं असेल असा टोला त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आणि गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या आशिर्वादामुळे राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना-भाजप युतीचं सरकार आल्याचे शिंदे गटाच्या आमदारांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, देवीच्या आशिर्वादामुळे राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यामुळे नवस फेडायला म्हणून आज आम्ही पन्नास आमदार गुवाहाटीला आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.