मंत्रिपद हुकल्याने नाराजी सुरूच… शिवसेनेचा आणखी एक नेता अधिवेशन सोडून मुंबईत; म्हणाले, मी दु:खी
एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपद मिळाले नाही, ज्यामुळे त्यांच्यामध्ये मोठा असंतोष आहे. प्रकाश सुर्वे आणि तानाजी सावंत यांसारख्या नेत्यांनी नागपूर अधिवेशन सोडले. सुर्वे यांनी आपले दुःख व्यक्त केले, तर सावंत थेट घरी गेले. शिंदे यांना हे दुःख कळेल अशी त्यांची आशा आहे.
मंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराजी अद्याप काही दूर झालेली नाही. मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत नाराज झाले. त्यामुळे नागपूर अधिवेशन सोडून ते तडक गावाकडे गेले. त्यापाठोपाठ शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेही प्रचंड नाराज झाले आहेत. सुर्वे सुद्धा नागपूरचं अधिवेशन सोडून तडक मुंबईला आले आहेत. मला मंत्रिपद मिळायला हवं होतं. मी नाराज नाही. पण मी दु:खी आहे, असं प्रकाश सूर्वे यांनी म्हटलं आहे.
मंत्रिपद न मिळाल्याने नाराज़ शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आज मुंबईतील जनसंपर्क कार्यालय गाठले. सूर्वे नागपूर अधिवेशन सोडून अचानक मुंबईत आल्याने त्यांच्या शेकडो समर्थकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे. या कार्यकर्त्यांनी प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी केली आहे. सुर्वे यांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे, अशी मागणी हे कार्यकर्ते करत होते. त्यामुळे हा परिसर घोषणांनी दणाणून गेला आहे.
दु:ख लपवणार नाही
या सर्व घडामोडींवर प्रकाश सुर्वे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी नाराज नाही. मी पहिल्या दिवशीही मी तेच सांगितलं. आताही तेच सांगतो. मी लढवय्या कार्यकर्ता आहे. संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. मला मंत्रिपद मिळालं नाही, याचं प्रचंड दु:ख झालं. मी माझं दु:ख लपवलं नाही. लपवणार नाही. मंत्रिमंडळात माझं नाव नाही. म्हणून दु:खी आहे, असं प्रकाश सुर्वे म्हणाले.
शिंदेंना माझं दु:ख कळत असेल
मी गरीब घरातून आलोय. एकनाथ शिंदे साहेबही गरीब घरातून आले आहेत. त्यांना गरिबीची जाणीव आहे. त्यांना माझं दु:ख कळत असेल. एखाद्याला संधी नाकारल्यानंतर किती दु:ख होतं याची जाणीव शिंदेंना आहे. एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली त्यांनी संधीचं सोनं केलं. मलाही संधी मिळाली असती तर पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली असती. पक्षाला नंबर वनवर नेलं असतं, असंही ते म्हणाले.
नाराज कोण कोण?
शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक नेते नाराज आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने हे नेते नाराज झाले आहेत. तानाजी सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते प्रचंड नाराज झाले. त्यामुळे ते अधिवेशनात थांबले नाहीत. ते थेट नागपूरहून घरी आले. तर दीपक केसरकर यांना शपथविधीसाठीचा कोणताही फोन न आल्याने शपथविधी सोहळ्याच्या दिवशी त्यांनी शिर्डी गाठली. केसरकर यांनी शिर्डीत येऊन पूजा अर्चा केली. शिंदे गटातील इतर नेत्यांनीही मंत्रिपद न मिळाल्याने आपली नाराजी बोलून दाखवली आहे.