“महाराष्ट्राला लागलेला कलंक पुसला जाईल” ; काँग्रेसने त्या 16 आमदारांचा आजच निकाल लावला
संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये जुंपली होती, त्यावरून त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत पुढे काहीच बोलणार नाहीत अशी व्यवस्थाच आम्ही केल्याची त्यांनी टीका केली आहे.
उल्हासनगर : महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून उद्धव ठाकरे यांचे सरकार उलथवून लावले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर ठाकरे गटाने जोरदार हल्लाबोल केला होता. तर उद्या सर्वोच्च न्यायालयाचा 16 आमदारांविषयी निकाल जाहीर होणार असल्याने आता सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून मत मतांतरे व्यक्त केली जात आहेत. या प्रकरणावरूनच आज काँग्रेसचे नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे आमदार अपात्र होणार असल्याचे सांगत त्यांनी थेट कायद्याचा संदर्भ देत हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागणार असल्याचेही त्यांच्याकडून व्यक्त केले जात आहे.
उद्याच्या निकालाविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात सत्तासंघर्ष दिसत असला तरी आमचा लोकशाहीवर आणि न्यायदेवतेवर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या निकालाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, हे शेड्युल 10 अंतर्गत निकाल लागल्यास अपात्रता निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे की, तुम्हीच निर्णय घ्यावा. त्यामुळे कोर्टातच निकाल लागेल आणि न्यायदेवता न्यायानुसार निर्णय देईल असा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. आताच्या अध्यक्षांबद्दल मला काहीच बोलायचं नाही असंही नाना पटोले यांनी सांगितले.
जे काही नाट्य महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी झालं आहे, त्यावेळी असलेले अध्यक्ष झिरवळ यांनी आपला वकील पाठवून सर्वोच्च न्यायालयानेच निर्णय घ्यावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.
तर उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा वेगळा विषय आणि शेड्युल 10 चा विषय वेगळा आहे. राजीनामा देण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, त्याला कोणतंही बंधन नाही. शेड्युल 10 मध्ये अपात्रतेची व्याख्या अतिशय स्पष्ट असून आम्हाला न्याय मिळणार आहे.
उद्याच्या या निकालामुळे महाराष्ट्राला लागलेला कलंक पुसला जाईल असा आम्हाला विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.
कर्नाटकात आज निवडणूक झाली आहे. त्यामुळे जे एक्झिट पोल येत होते, त्यामध्ये 50 ते 60 टक्के मतदारांची पसंती काँग्रेसला होती.
150 पेक्षा जास्त जागा काँग्रेस नक्कीच जिंकणार असून भाजप कर्नाटकातून नक्कीच हद्दपार होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत हे खोकेवालेच म्हणू शकतात, मात्र त्यावर आम्हाला काही बोलायचं नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
तर काही दिवसांपूर्वी संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये जुंपली होती, त्यावरून त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत पुढे काहीच बोलणार नाहीत अशी व्यवस्थाच आम्ही केल्याची त्यांनी टीका केली आहे.