किती जागांवर लढणार, शिंदे गटाच्या बैठकीत ठरलं, शिवसेना खासदाराने दिली माहिती
Shiv Sena : भाजप आणि शिंदे गट आगामी सर्व निवडणुका एकत्र येऊन लढवणार आहे. त्यात शिंदे गटाला किती जागा मिळणार? यासंदर्भात चर्चा सुरु आहे. शिंदे गटाची बैठक नुकतीच झाली. त्यात जागा वाटपाचे सूत्र निश्चित केले गेले.
मुंबई : राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे गट एकत्र मिळून ही निवडणूक लढणार आहे. त्यात शिंदे गटाला किती जागा मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी 240 जागा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावेळी खळबळ उडाली होती. आता शिंदे गटाची बैठक झाली. त्यात किती जागा लढव्यावा, यासंदर्भात निर्णय झाला आहे.
काय झाला निर्णय
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेना खासदारांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना जागावाटपाच्या सूत्रानुसार शिवसेना 48 पैकी 22 जागा लढवणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी ही माहिती दिली.
त्या सर्व खासदारांना उमेदवारी
उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन शिंदे गटात सामील झालेल्या तेरा खासदारांची उमेदवारी कायम राहणार आहे. मात्र, उर्वरित पाच जागा आणि इतर चार म्हणजे रायगड, शिरूर, औरंगाबाद आणि अमरावती, ज्या तत्कालीन शिवसेनेने गमावल्या होत्या, त्यावर साहजिकच आमचा दावा असेल, असे कीर्तिकर यांनी सांगितले. बैठकीत 13 पैकी सुमारे 10 खासदार सहभागी झाले होते.
महाविकास आघाडीत वाद
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून वाद सुरू आहे. त्याच वेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीमध्ये आपला नैसर्गिक दावा सुनिश्चित करण्यासाठी तयारी केली आहे. त्यावर अजून भाजपकडून काही उत्तर आलेले नाही.
महाविकास आघाडीचा जागेवाटपाचा फॉर्म्युला अजून ठरायचा आहे. परंतु संजय राऊत यांनी राज्यातील आमचे १८ खासदार असतील, असे स्पष्ट केले. महाविकास आघाडीचा आपण घटक पक्ष आहोत. आघाडी मजबूत ठेवायची आहे. पण ते करत असताना तुमची ताकद जास्त असेल तरच तुम्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिलं जाईल, असे अजित पवार यांनी काँग्रेसला सुनावले होते. त्यावर काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते. म्हणजेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते वेगवेगळी भूमिका जाहीर करत होते.