दोन पोटनिवडणुका कोण लढवणार? सस्पेन्स संपणार?; सत्ताधारी-विरोधकांच्या आज जोरबैठका
एमआयएम दोन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असून ही निवडणूक ताकदीने लढणार आहे. या निवडणुकीचं नेतृत्व खासदार इम्तियाज जलील करणार आहेत. पुण्यात झालेल्या एमआयएमच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई: कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाने अजूनही या दोन्ही निवडणुकीसाठी आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार कोण असेल? अशी चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे या दोन्ही पोटनिवडणुकीत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांपैकी कोणता पक्ष उमेदवार देणार? अशी चर्चाही रंगली आहे. ठाकरे गट एक विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. तर राष्ट्रवादीला दोन्ही जागा लढवायच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांचा तिढा कायम आहे. त्यावर आज तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाने कसबा पोटनिवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला आहे. तर राष्ट्रवादीने कसबा आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आज मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत कसबा विधानसभा निवडणूक लढवायची की नाही? याचा फैसला होणार आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरे, अजितदादांची चर्चा
दरम्यान, काल रात्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाली. यावेळी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. राष्ट्रवादीने या दोन्ही जागा लढण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्याचं सांगण्यात येतं.
भाजपची बैठक, आजच निर्णय?
दरम्यान, भाजपचीही आज बैठक होणार आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील आज दुपारी 1 वाजता भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. चिंचवडच्या जागेबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच यावेळी उमेदवारही ठरला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भाजपच्या या बैठकीकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे.
भाजपच्या या बैठकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे बंधू शंकर जगताप ही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता असून बैठक संपताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पत्रकारांशी संवाद ही साधणार आहेत,
एमआयएम लढणार
आघाडी आणि भाजपमध्ये अद्यापही उमेदवारीबाबत ठरत नसलं तरी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत आता एमआयएमनेही उडी घेतली आहे. एमआयएमने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
एमआयएम दोन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असून ही निवडणूक ताकदीने लढणार आहे. या निवडणुकीचं नेतृत्व खासदार इम्तियाज जलील करणार आहेत. पुण्यात झालेल्या एमआयएमच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
7 फेब्रवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख
दरम्यान, येत्या 27 फेब्रुवारी रोजी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक होत आहे. 7 फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 8 फेब्रुवारी रोजी अर्ज छाननी होणार आहे. तर 10 फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. या निवडणुकीसाठी मतमोजणी 2 मार्च रोजी होणार आहे. त्याच दिवशी निकालही लागणार आहे.