Shivsena vs BJP: याकूब मेमनच्या कबरीवरुन शिवसेना-भाजपात जुंपली, राऊफ मेमनच्या नेत्यांच्या भेटीवरुन आरोप-प्रत्यारोप
याच मुद्द्यावर एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शिवसेनेच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांचा राऊफ मेमनच्या भेटीचा हा व्हिडीओ आहे. राऊफ मेमन हा याकूब मेमनचा नातेवाईक आहे. हा व्हिडिओनंतर शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांसोबत राऊफ दाऊद याच्या भेटीचे फोटो प्रत्युत्तरादाखल पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दाखवले आहेत.
मुंबई – 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन (Yakub Memon)याच्या कबरीच्या सुशोभीकरणाचा राजकीय धुराळा अजून बसलेला नाही. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हे सुशोभीकरण झाल्याचा आरोप सातत्याने भाजपाकडून (BJP) करण्यात येतो आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या प्रचाराची भूमिका शिवसेनेने घेतली असल्याची टीका भाजपाकडून करण्यात येते आहे. याच मुद्द्यावर एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शिवसेनेच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांचा राऊफ मेमनच्या भेटीचा हा व्हिडीओ आहे. राऊफ मेमन हा याकूब मेमनचा नातेवाईक आहे. हा व्हिडिओनंतर शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांसोबत राऊफ दाऊद याच्या भेटीचे फोटो प्रत्युत्तरादाखल पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दाखवले आहेत. यावरुन दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच जुंपलेली दिलत आहे.
कबरीची मजार मविआ सरकारच्या काळात- कंबोज
याकूब मेमनच्या कबरीच्या चौथऱ्याला सुशोभित करून त्याची मजार करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले असल्याचा गंभीर आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. केवळ याकूब मेमनच नव्हे तर त्याच्या इतर नातलगांच्या कबरींनाही मजार करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अडीच वर्षात मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी हिंदुत्वाचा विचार सोडला, असल्याची टीका त्यांनी केली आहे. नवाब मलिक यांचा राजीनामादेखील तेंव्हा उद्धव ठाकरे यांनी घेतला नव्हता, याची आठवण त्यांनी करुन दिली आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत आणखी गौप्यस्फोट करणार. असा इशाराही कंबोज यांनी दिला आहे.
किशोरी पडेणेकर काय म्हणाल्या?
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिले आहे. भाजपाकडून हा शिवसेनेच्या बदनामीचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या बैठकीत ज्यांनी तक्रार केली त्या आणि भाजपाचे आकाश पुरोहितही सहभागी झाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महापौर म्हणून कोरोना काळात मंदिर,मशिदी, गुरुद्वारामध्ये भेटी दिल्या होत्या, पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या होत्या, असे त्यांनी सांगितले आहे
फडणवीस, राज्यपालांसोबत राऊफ मेमन यांचे फोटो
तसेच यावेळी किशोरी पेडणेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे राऊफ मेमन यांचे फोटो दाखवत, याला उत्तर देणार का, असा सवाल भाजपाला विचारला आहे. आपण यावर आक्षेप घेत नाही, मात्र आपल्याला घेरण्यात येत असेल, तर या फोटोंना उत्तर द्या, असे प्रतिआव्हान त्यांनी भाजपाला दिले आहे. यावेळी पेडणेकर भाऊक झालेल्याही पाहायला मिळाल्या. यावेळी त्यांनी मोहित कंबोज यांच्यावरही टीका केली आहे.
भाजपा नेते प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
याकूब मेमन हा दहशतवादी होता. त्याच्या कबरीचं उदात्तीकरण करता आणि तुम्ही नाकानं कांदे कशाला सोलत आहात, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी पेडणेकरांना विचारला आहे. किशोरी पेडणेकर या राऊफ मेमनला कशाला भेटल्या होत्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या सगळया प्रकाराला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसतो आहे. याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणाच्या निमित्ताने मोठा मुद्दा भाजपाला हाती लागलेला दिसतो आहे. येत्या काळात या मुद्द्याचे अधिक राजकारण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.