मोठी बातमी ! कधीकाळी जे शब्दाबाहेर नव्हते, तेच आमदार आज म्हणताहेत, संजय राऊत यांना अटक करा
आम्ही चोर असू तर सभागृहात जनतेचे प्रश्न मांडणार कोण? आम्हाला आम्ही चोर नसल्याचं सिद्ध करायचं आहे. चोर आम्ही आहोत की संजय राऊत हे सिद्ध करायचं आहे. प्रश्न आजचे उद्या मांडू. पण आम्हाला डाग लागला तर तो पुसला जाणार नाही.
मुंबई : संजय राऊत यांनी अत्यंत चुकीचं विधान केलं आहे. त्यांनी असंसदीय भाषेचा वापर करून आमचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई झालीच पाहिजे. विधानसभा अध्यक्ष दोन दिवसात या प्रकरणावर निर्णय घेणार आहे. पण आम्हाला दोन दिवसांची मुदत मान्य नाही. संजय राऊत यांच्यावर ताबडतोब आणि तात्काळ अटक करा, अशी मागणीच शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी केली. विधान भवनाच्या आवारात मीडियाशी संवाद साधताना भरत गोगावले यांनी ही मागणी केली आहे.
संजय राऊत यांचं विधान चुकीचं आणि असंसदीय आहे. आम्ही त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला आहे. अध्यक्षांनी हक्क भंग दाखल करून घेतला आहे. त्यावर कारवाई केली जाईल. जे वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. ते संपूर्ण सभागृहाला उद्देशून केलं आहे. सभागृहाने त्याची दखल घ्यावी. त्यांना तातडीने अटक करावी. त्यांना शिक्षा करावी. दोन दिवसाची मुदत मान्य नाही. लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी भरत गोगावले यांनी केली. विशेष म्हणजे कधीकाळी जे आमदार संजय राऊत यांचे आदेश पाळत होते. राऊतांच्या शब्दा बाहेर नव्हते, तेच आज त्यांच्या अटकेची मागणी करत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मग सभागृहात कोण प्रश्न मांडणार?
आम्ही चोर असू तर सभागृहात जनतेचे प्रश्न मांडणार कोण? आम्हाला आम्ही चोर नसल्याचं सिद्ध करायचं आहे. चोर आम्ही आहोत की संजय राऊत हे सिद्ध करायचं आहे. प्रश्न आजचे उद्या मांडू. पण आम्हाला डाग लागला तर तो पुसला जाणार नाही. त्यामुळेच राऊत यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही मागणी करत आहोत, असं सांगतानाच आमची मते घेऊन खासदार झाला. हिंमत असेल तर राजीनामा द्यावा आणि मग निवडून या, असं आव्हानच गोगावले यांनी केलं.
प्रभू चोर असतील तर
हिंमत असेल तर संजय राऊत यांनी सुरक्षा व्यवस्था नाकारावी. मग बघू. ते खरे आहेत की खोटे शिवसैनिक. सुनील प्रभूंनी राऊतांचं सभागृहात समर्थन केलं नाही. बाहेर केलं असेल तर माहीत नाही. प्रभू चोर असेल तर ते राऊतांचं समर्थन करतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
संजय राऊतांचं करायचं काय?
दरम्यान, सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब होताच भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. नीम का पत्ता कडवा है, संजय राऊत XXX है, अरे या संजय राऊतचं करायचं काय?, खाली डोकं वरी पाय, अटक करा, अटक करा, संजय राऊतांना अटक करा, अशा घोषणा या आमदारांनी देऊन संपूर्ण विधानभवन परिसर दणाणून सोडला.