उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी शिंदे गटाची आणखी एक खेळी, महापालिका निवडणुकांची जबाबदारी ‘या’ सहा नेत्यांवर
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदे गटात मोर्चेबांधणी आखली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.
निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक आणि शिवसेना पक्ष यांचा तर फार जवळचा संबंध आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पण आज परिस्थिती फार वेगळी आहे. कारण शिवसेनेचं विभाजन झालंय. शिवसेना शिंदे गट आणि ठाकर गट अशा दोन गटात विभागली गेलीय. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी, तसेच भाजपसाठी देखील महत्त्वाची ठरणार आहे. मुंबईकर शिवसेनेच्या या विभाजनाकडे कोणत्या दृष्टीकोनाने पाहतात हे या निवडणुकीतून स्पष्ट होऊ शकतं. पण मुंबईकरांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदे गटात मोर्चेबांधणी आखली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. शिंदे गटात तर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.
काही दिवसांपूर्वी खासदार गजानन कीर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलीय. त्यांच्यासह शिंदे गटाच्या एकूण सहा दिग्गज नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
शिंदे गटाकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्राची संघटनात्मक कार्याची जबाबदारी जाहीर करण्यात आलीय.
खासदार गजानन कीर्तिकर, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, आशा मामीडी, कामिनी शेवाळे या सहा नेत्यांवर संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज मुंबईतील मंत्रालय समोरील बाळासाहेब भवन येथे बैठक झाली. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या सहा महिन्यांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. राज्यात सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर घडून आलं. शिवसेना सारखा मोठ्या पक्षात उभी फूट पडली. शिवसेना पक्षामध्ये झालेल्या या विभाजनाचे पडसाद आगामी मुबंई महापालिका निवडणुकीत निश्चितच पडतील. या निवडणुकीत जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूला आहे ते स्पष्ट होण्याची चिन्हं आहेत.