शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीत एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक, पक्षाविरोधात कृत्य करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी रणनीती
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) शिवसेना (Shiv Sena) पक्ष मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत पक्षाविरोधात कारवाई करणाऱ्यांसाठी एक तीन सदस्यांची समिती तयार करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्य नेतेपदी कायम ठेवलं आहे. पक्षाचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना असणार आहेत. या बैठकीत मराठीला अभिजात दर्जा देण्याचा ठराव झालाय. तसेच 80 टक्के भूमिपुत्रांना नोकरी देण्याचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव झालाय.
“आज शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी असेल याबद्दल ठराव झाले”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.
शिस्तबद्ध समितीची स्थापन
“शिवसेनेची आगामी संघटनात्मक वाटचाल करण्यासाठी शिस्तबद्ध समितीची स्थापन करण्यात आलीय. त्याचं अध्यक्षपद मंत्री दादा भुसे यांना देण्यात आलंय. यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि संजय मोरे यांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आलंय. अशी तीन जणांची ही समिती आहे. पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई, पक्षाच्या विरोधात काही लोकांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर शिस्तभंग होईल का याची छाननी करण्यासाठी या समितीची आखणी करण्यात आलीय”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
उदय सामंत यांनी आणखी काय-काय म्हणाले?
संघटनात्मक आपण कशापद्धतीने वाटचाल करायची यावर चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. याशिवाय “सरकारने जे आठ महिन्यांत काम केलंय, त्या कामाची नोंद बैठकीत घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांवरुन त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
“स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव मांडण्यात आला. स्थानिकांना उद्योगात 80 टक्के प्राधान्य देण्याबाबत ठराव झाला. वीर माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, छत्रपती संभाजी महाराज यांची नावं राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत यावे, असाही ठराव झाला”, अशीदेखील माहिती त्यांनी यावेळी दिली.
गड-किल्ल्यांचं संवर्धन व्हावं, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असा ठराव या बैठकीत झाला. चर्चगेट रेल्वे स्थानकाला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचं नाव देण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मराठी मुलांना पाठिंबा देण्याबाबतचाही ठराव करण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.