एकनाथ शिंदे, अयोध्या दौरा आणि ठाकरे गटाचा निशाणा, दोन ‘शिवसेना’ आमनेसामने
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याला लखनौपासून सुरुवात झालीय. शिंदे, मंत्री आणि आमदारांसह लखनौला दाखल झालेत. तर शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी बोचरी टीका केलीय. रावण राज्य चालवणारे, अयोध्येला चाललेत असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांची शिवसेना (Shiv Sena) रामलल्लांच्या दर्शनासाठी आलेत. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा आहेत. शिवसेनेचे मंत्री आणि आमदारच नाही, तर भाजपचे मंत्री आणि नेतेही शिंदेसोबत आहेत. गिरीश महाजन, संजय कुटे, मोहित कंबोज, राम शिंदेही शिंदेंच्या शिवसेनेसोबत आलेत. दुसरीकडे शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन, संजय राऊतांनी बोचरी टीका केलीय. महाराष्ट्रात केलेले पाप धुण्यासाठी शिंदे अयोध्येत जात असल्याचं राऊत म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेसह भाजपच्या नेत्यांनीही राऊतांचा समाचार घेतला.
शिंदेंचा 2 दिवसांचा दौरा आहे. शिंदे मंत्री आणि आमदारांसोबत आधी लखनौला मुक्काम करणार आहेत आणि नंतर अयोध्येत दाखल होतील. पण राऊतांप्रमाणंच आदित्य ठाकरेंनीही शिंदेवर निशाणा साधला. रावण राज्य चालवणारे अयोध्येला जात असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केलीय.
शिंदेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, अयोध्येत खास तयारीही करण्यात आलीय. ठिकठिकाणी शिंदेंच्या स्वागताचे बॅनर लागलेत. शरयू नदीच्या किनारी स्वच्छता करण्यात आलीय. भगवान श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर शिंदे शरयू नदीची आरती करणार आहेत. पण ठाकरे गटाच्या पाठोपाठ अजित पवारांनीही शिंदेंना लक्ष्य केलं. रिक्षा चालवणारे अयोध्येला चाललेत, असं अजित पवार म्हणाले.
याआधी शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. आता प्रभू श्रीरामाचं दर्शन घेत आहेत. अर्थात हिंदुत्वाच्या ट्रॅक आम्हीच कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न शिंदेंचा आहे.
एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटावर निशाणा
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत दाखल झाल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “खूप आनंद आणि समाधान आहे. तुम्ही वातावरण तर बघताय. संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. सर्व अयोध्या भगवी झाली आहे. हजारो कार्यकर्ते स्वागतासाठी आले आहेत. मी त्यांचा आभारी आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा रामलल्लांच दर्शन घ्यायला येतोय. मी खूप समाधानी आहे. खूप आनंदी आहे. अयोध्या आणि रामलल्लांचं दर्शन हे राजकीय विषय नाहीत. श्रद्धा, भक्ती, भावना आणि अस्मितेचा विषय आहे. अयोध्या यात्रेचा कुणीही राजकीय अर्थ काढू नये. फक्त दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिंदे यांना आम्ही अयोध्या दाखवली, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात येतेय. यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. “त्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला. मी त्यावर उद्या सविस्तर बोलतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धन्यवाद देतो. त्यांचे मंत्री स्वागतासाठी आले आहेत. हजारो कार्यकर्ते स्वागतासाठी आले आहेत”, असंदेखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.