ठाकरे गटाला ‘ती’ एक चूक प्रचंड भोवणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर उद्या ऐतिहासिक निकाल येण्याची शक्यता आहे. पण या निकालाआधी शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी मोठा दावा केला. ठाकरे गटाने सुनावणीदरम्यान एक चूक केल्याचा दावा भरत गोगावले यांनी केलाय.
गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 9 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आमदार भरत गोगावले यांनी मोठा दावा केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निकाल जाहीर करणार आहेत. हा निकाल आपल्याच बाजूने लागणार असं भरत गोगावले म्हणाले. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांकडे कागदपत्रांची हवी तशी पूर्तता केलेली नाही. त्यांचं प्रकरण गंडलंय, असा मोठा दावा केला. त्यामुळे ठाकरे गटाकडून खरंच तशी चूक झाली असेल तर ती त्यांना भोवण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. पण भरत गोगावले यांचा दावा कितीपत खरा आहे हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. दरम्यान, “एकनाथ शिंदे हे आमचे गटनेते आहेत आणि होते. त्यामुळे त्यांनी माझी नियुक्ती केली त्यांच्या अधिकारांमध्ये, त्या हिशोबाने मी गटनेता आहे आणि आमचाच व्हिप लागू होतो. सुनील प्रभूंना विचारा की त्यांनी सुनावणीच्या दरम्यान कागदपत्रांची पूर्तता योग्यरीत्या केली आहे का? त्यांचं प्रकरण गंडलंय. आमची बाजू आम्ही भक्कम मांडली आहे. विजय आमचाच होईल”, असं भरत गोगावले म्हणाले आहेत.
“आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. तो निकाल उद्या जाहीर होणार आहे. प्रत्येक पक्षकाराला वाटतं की निकाल आपल्या बाजूने लागावा. तसं आम्हालाही आपल्या बाजूने निकाल लागावा असं वाटतंय. त्याप्रमाणे आमच्या ज्या उलटतपासणी झाल्या त्यामध्ये आम्हाला जे काही प्रश्न विचारण्यात आले त्यांची उत्तरे आम्ही दिली आहेत”, असा दावा भरत गोगावले यांनी केला.
‘त्यांच्यात हिंमत असती तर…’
“तुम्हाला वाटत असेल तर सुनील प्रभूंनी दिलेली उत्तरे आणि आम्ही दिलेली उत्तरे यामध्ये तफावत आहे. आम्ही मेरीटमध्ये आहोत हे कुणाला नाकारायची गरजही नाही. पण त्याला आता काहीच पर्याय उरला नाही. जे 15 ते 16 लोकं आहेत ते टिकून राहावेत म्हणून त्यांनी केलेला हा अट्टहास आहे. त्यांच्यात हिंमत असती तर अविश्वासाच्या ठरावाला सामोरे गेले असते ना? पण ते अगोदरच राजीनामा देवून मोकळे झाले. याचा अर्थ त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. त्या सगळ्या घडामोडींममध्ये आम्हाला खात्री आहे की, निकाल आमच्याच बाजूने लागेल. आम्हाला पूर्ण खात्री आहे, जे होईल ते चांगलंच होईल”, असं भरत गोगावले म्हणाले.
“एकनाथ शिंदे आमचे पूर्वी गटनेते होते. आमच्या गटनेत्यांनी आमची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आमचं कामकाज नियुक्तीनुसार सुरु आहे. याची कल्पना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना आहे. मग त्यांना एवढा आत्मविश्वास आहे तर त्यांना घाबरण्याचं कारण काय? असं आम्हाला वाटतंय”, असंही ते म्हणाले.
“दरवर्षी मी 31 डिसेंबरला देवदर्शन करत असतो. यावर्षी देखील मी अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे गेलो, शिर्डीला गेलो सगळ्यांसाठी तीही तरी मागितलं आहे. माझ्यासाठीही देवाकडे मागितलंय पण कसं आहे नेहमी तेच-तेच बोलून काही ठोस हाती लागत नाही. त्यामुळे यावेळी बोलणार नाही. पण वाट पाहणार”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर दिली.