‘मशाल पेटवून खुशाल झोपणाऱ्यांना…’, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा सभागृहात घणाघात
मशाल पेटवून खुशाल झोपणाऱ्यांना या निकालामुळे काही शहाणपण आले असेल. कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, अशी त्यांची वृत्ती आहे.

तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारताना बोट दाखवतात तेव्हा तीन बोट तुमच्याकडे असतात. उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना किंवा कंगना रणावत हिच्या कार्यालयात बुलडोझर चालवताना, मनसुख हिरने प्रकरण असो की हनुमान चालीसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला आत टाकले तेव्हा कुठे होते, तुमचे संविधान? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित करत तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारला जाब विचारला. आंतीम आठवडा प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांना घेरले. औरंगजेबच्या कबरीचे उद्दीतकरण करणे, नागपूर दंगल या विषयावर त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.
कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी सांगितले की, मशाल पेटवून खुशाल झोपणाऱ्यांना या निकालामुळे काही शहाणपण आले असेल. कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, अशी त्यांची वृत्ती आहे. त्यांना लोकांनी दाखवून दिले खरे कोण आहे. त्यानंतरही हे सुधरत नाही. तुम्ही गद्दार गद्दार म्हणत बसला तुम्हाला एक दिवस दार बंद करुन पक्षाचे दुकान बंद करावे लागले. कारण आता गद्दार कोण? याचा निकाल सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि राज्यातील जनतेने दिला आहे.
बाळासाहेबांची शिवसेना यांनी कचऱ्याच्या डब्ब्यात टाकली होती. आम्ही तिला बाहेर काढली. आरसात बसून वारसा सांगता येत नाही. सुपाऱ्या देऊन बदनामीच्या मोहिमा चालवल्या तरी फरक पडणार नाही. काही पाखंडी लोकांना पुढे करुन काही श्रीखंडी लोक त्याचा आधार घेत आहे. रोज तुमच्याकडून जे सुरु आहे, त्यामुळे हे बोलावे लागत आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.




इतर विषयांवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, संतोष देशमुख खटल्यातील आरोपी कृष्णा अंधाळे याची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. काही गुंड लोकांना त्रास देत आहे. गुंडांच्या नाड्या ठेचल्या जातील. मुंबई खड्डेमुक्त होणार आहे. कारण आम्ही काँग्रेंटचे रस्ते करत आहोत. ठेकेदारी आम्ही मोडली. त्यामुळे काही लोक चवताळले आहे. दहा वर्षांत डांबरचे सांबर कोणी खाल्ले? त्याची चौकशी झाली पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.