हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवा, परब हे खेडेकर-कदम यांचे ‘महात्मा गांधी’; रामदास कदम यांचा हल्लाबोल
शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.
मुंबई: शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवा, असं आव्हानच रामदास कदम यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर थेट हल्ला चढवला. यावेळी त्यांनी अनिल परब यांचा बाप काढतानाच त्यांना हरामखोर म्हणूनही हिणवले. मी किरीट सोमय्यांना कधीच भेटलो नाही. त्यांना कोणतेही कागदपत्रं दिली नाहीत. पण माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं आहे. त्यामागे अनिल परब यांचा हात असल्याचं सांगतानाच अनिल परब हे साधं निवडून येऊ शकत नाहीत. त्यांनी हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवावं, असा जोरदार हल्ला कदम यांनी चढवला.
मुलाचं तिकीट कापण्याचा प्रयत्न
माझा मुलगा योगेश याला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या संजय कदमला मातोश्रीवर आणलं होतं. संजय कदमला तिकीट मिळावं म्हणून वारंवार प्रयत्न केले. पण माझ्या मुलाला तिकीट मिळालं. तो निवडून आला. परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी एकदाही माझ्या मुलाचा फोन उचलला नाही. उलट संजय कदमशी सातत्याने संपर्क ठेवला. या भागात मनसेचे वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना सातत्याने पाठी घालण्याचं काम परब यांनी केलं. अनिल परब हे कदम आणि खेडेकरांचे महात्मा गांधी आहेत, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
परब शिवसेनेच्या मुळावर
गद्दार कोण अनिल परब की रामदास कदम हे शिवसैनिकांना कळलं पाहिजे म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर परब हे शिवसेनेच्या मुळावर उतरले आहेत. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. योगेश कदम आमदार आहेत. त्यांनी उमेदवार पाहिले. पक्षाला कळवलं. आणि पक्षनेत्यांनी मुलाखती घेतल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही, असं ते म्हणाले.
परब निष्ठावंत कसे?
परबने मिटिंग बोलावली या मिटिंगला राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि सूर्यकांत दळवी होते. पाच वर्ष या सूर्यकांत दळवींनी संजय कदम यांच्या खांद्याला खांदा लावून माझ्या मुलाविरोधात काम केलं. त्यानंतर परब यांनी आमच्या पक्षाचे निष्ठावंत नेते उदय सामंत यांना बोलावून घेतलं. आता सामंत यांच्याकडून निष्ठा शिकावी लागते. त्यांना परब यांनी बोलावलं आणि तिकीट वाटप केलं. राष्ट्रवादीला 9 आणि शिवसेनाला 5 जागा घेतल्या. पहिले अडीच वर्ष राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेची पाच वर्ष सत्ता असतानाही राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद दिलं. मग परब निष्ठावंत कसे? त्यांनी संपूर्ण पक्ष राष्ट्रवादीला आंदण देण्याचं काम सुरू केलं आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
संबंधित बातम्या: