मुंबई: भाजप सोबतच्या आमच्या नात्यात कधीच कटुता आली नाही. कधी येणार नाही. आमच्यातील बंधन हे हिंदुत्वाचं बंधन आहे, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. राऊत यांनी डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणूनच हे विधान केल्याचा कयासही वर्तवला जात आहे. (shiv sena leader sanjay raut reaction on alliance with bjp)
शिवसेना नेते संजय राऊत मीडियाशी बोलत होते. यावेळी त्यांना शिवसेना भाजपच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या नात्यात कधी कटुता आली नाही. कधी येणार नाही. आम्ही वैचारिक बंधनाने नेहमीच जोडलेलो आहोत. ते बंधन हिंदुत्वाचं आहे. आम्ही वेगळे झालो आहोत, पण आम्ही कधी एकमेकांवर वैयक्तिक दुश्मनीचं वातावरण तयार केलं नाही. आम्ही कधीच एकमेकांच्या कार्यालयावर दगडफेक केली नाही. एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला नाही, असं सांगतानाच पण बाहेरून आलेल्या भाजपच्या लोकांना वाटतं हा संघर्ष सुरू राहावा. याचा सर्वात मोठा धोका भाजपचे विद्यमान नेत्यांना राहील, असा इशारा राऊत यांनी दिला.
महाराष्ट्रात आणि देशात बांगलादेशी घुसतात संपूर्ण देश खराब करतात. भाजपमधील घुसखोरांनी तसंच केलं आहे. भाजपच्या शुद्धीकरणाची गरज आहे. हा खूप मोठा पक्ष आहे. हिंदुत्वासाठी या पक्षाने मोठं काम केलं आहे. आम्ही 25 वर्षे त्यांच्यासोबत होतो. त्यांचं योगदान आम्ही जाणून आहे. पण ज्यांना हे माहीत नाही, जे बाहेरून आले आहेत, ते लोक शिवसेनेवर चिखलफेक करत आहेत, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
आता कोणी तरी बाहेरचा माणूस येतो शिवसेना भवनावर दगड मारू म्हणतो, कोणी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारू म्हणतो. हे मूळ भाजपचा माणूस बोलणार नाही, हे बाहेरचे बाडगे बोलतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार हे कधी बोलणार नाहीत. हे सगळे बाहेरून आलेले लोकं आहेत. महाराष्ट्रात, देशात बांगलादेशचे घुसखोर आणि पाकिस्तानचे घुसखोर हैदोस घालतात आणि आपण त्यांच्याविरोधात कारवाया करतो. महौल बिघडवतात. तसंच भाजपमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी माहौल बिघडवत आहेत, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्य दिनाचा हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव समजून सांगण्यासाठी भाजपकडून पत्रं लिहिली जाणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अच्छा पत्रं लिहिणार आहेत. त्यांना लिहिता वाचताही येतं? चांगली गोष्ट आहे. आम्हाला स्वातंत्र्य संग्रामाबाबत सांगायची गरज नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र दोन्ही राज्ये क्रांतीकारकांची भूमी आहे. मिस्टर नारायण राणे हे बंगालचा आणि महाराष्ट्राचा अवमान करत आहे. बंगाल आणि महाराष्ट्राच्या योगदानाची ज्या मंत्र्याला माहिती नाही, ते आम्हाला स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगत आहेत. त्यांनी आधी इतिहास वाचावा. भाजपने त्यांना इतिहासाचं पुस्तक द्यावं, असा टोला त्यांनी लगावला.
तुम्ही लेटर पॉलिटिक्स करा किंवा गटर पॉलिटिक्स करा. पण आमच्या सोबत सामना करणं अशक्य आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही करत राहा. ही तुमची वैफल्यग्रस्तता आहे. तुमचं नैराश्य असं काढू नका. तुम्ही देश आणि महाराष्ट्रासाठी चांगलं आणि विधायक काम करा. अशा प्रकारची भाषा करू नका. राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात. आम्ही सहन करतो. तुम्हीही सहन करा, असं त्यांनी सांगितलं. (shiv sena leader sanjay raut reaction on alliance with bjp)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 August 2021https://t.co/UO1rQexmHK#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 27, 2021
संबंधित बातम्या:
भाजपमधील घुसखोरांनी माहौल बिघडवला, भाजपला शुद्धीकरणाची गरज; संजय राऊतांचा टोला
(shiv sena leader sanjay raut reaction on alliance with bjp)