मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीएच्या अस्तित्वावरच प्रश्नच चिन्ह उपस्थित केला. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एनडीएच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण केले आहेत. एनडीए तरी कुठे अस्तित्वात आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट झाली. पण, या क्षणी कोणतीही आघाडी सक्रिय दिसत नाही. यूपीए दिसत नाही. एनडीएही नाही. एनडीए तर संपलेली आहे, असं राऊत म्हणाले. शरद पवार आणि ममता बॅनर्जी काही करत असेल तर आम्ही त्याकडे डोळसपणे पाहतो. हे अनुभवी लोकं आहेत. काय करायचं आणि काय नाही हे त्यांना माहीत आहे. नेता कोण हा विषय नाही. तर समर्थ पर्याय देणं हे महत्त्वाचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ममता बॅनर्जी यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्या मीडियाला सामोरे गेल्या. यावेळी त्यांना यूपीए संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. शरद पवार यांनी यूपीएचं नेतृत्व करावं असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल ममता बॅनर्जी यांना करण्यात आला. त्यावर कुठे आहे यूपीए? आता यूपीए नाहीये. यूपीए काय आहे? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. ममतादीदींनी थेट यूपीएचं असित्वच नाकारलं. त्यामुळे ममतादीदींना काँग्रेसच्याच नेतृत्वाला आव्हान दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी आजही भाजवर जोरदार हल्ला चढवला. ममतादीदी या काय मुंबई लुटायला, ओरबडायला आल्या आहेत का? ममता बॅनर्जी मुंबई लुटायला आल्या असं जे म्हणत आहेत ते मूर्ख लोकं आहेत. माझा प्रश्न आहे की आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे अर्ध मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. व्हाटब्रंट गुजरातसाठी ते मुंबईत आले. व्हायब्रंट गुजरात तिकडे. मुंबईत काय कशासाठी? व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोड शो करता, उद्योगपतींना आकर्षित करता ते चालतं का? यालाच मी लूट म्हणतो, असं ते म्हणाले. भाजपला आरोप करू द्या. त्यांना आरोपांचे जुलाब होत आहेत. त्यांना आरोपांचा डायरीया झाला आहे. त्यांना तोंडाचा डायरीया झाला आहे. दुर्गंधी काही काळ निर्माण करतात. त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असा हल्लाही त्यांनी चढवला.
संबंधित बातम्या:
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 300 जागाही जिंकू शकणार नाही; गुलाम नबी आझादांचं मोठं विधान