VIDEO: मिरच्या झोंबल्या, बांबू लागला म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला ना?; राऊतांनी फडणवीसांना डिवचले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणात काहीच नव्हते, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची शिवसेना नेते संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणात काहीच नव्हते, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची शिवसेना नेते संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. मिरच्या झोंबल्या, ठसका लागला, बांबू लागला म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला ना? नाही तर एवढी मोठी पत्रकार परिषद कशाला घेतली असती?, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी
संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात काहीच नव्हते असं म्हणता तर मग एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन वेळ का खाताय? तुम्हाला मिरच्या झोंबल्या, ठसका लागला, बांबू लागला. सगळं काही लागलं. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागला. याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण सुपरहिट, दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत झालं आहे. त्यामुळे आपण सर्व अस्वस्थ आहात, असा चिमटा राऊत यांनी काढला.
औरंगजेबाला कवटाळून बसला होता का?
शिवसेनेने औरंगाबादचे संभाजी नगर नामांतर का केलं नाही? या फडणवीसांच्या प्रश्नावर त्यांनी प्रतिसवाल केला. आपणही पाच वर्ष मुख्यमंत्री होता. त्यावेळी औरंगजेबाला कवटाळून बसला होता का? हिंदुत्ववादी म्हणून आपण पाच वर्ष मुख्यमंत्री होता ना? एखाद्या शहराचं नाव बदलायचं असेल तर केंद्राची परवानगी लागते. गेल्या काही वर्षापासून सरकार केंद्राकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. केंद्राने का परवानगी दिली नाही हे विचारावे लागेल. तुम्हीही पाच वर्ष मुख्यमंत्री होता, औरंगाबादचं नामांतर करावं असं तुम्हाला का वाटलं नाही. योगींनी प्रयागराज करून घेतलं तसंच फडणवीसांनी औरंगाबादचं संभाजी नगर का केलं नाही? हा सुद्धा प्रश्न आहे. बाळासाहेबांनी जेव्हा संभाजी नगर म्हणायला सुरुवात केली तेव्हाच आमच्यासाठी औरंगाबादचं संभाजी नगर झालं आहे, असंही ते म्हणाले.
रामभाऊ म्हाळगीत शिबीर घेऊ
भाजपच्या जन्मतारखेचा दाखला जर त्यांनी आणला तर उत्तर देणं सोपं होईल. लोकांना कळेल भाजप कधी जन्माला आला आणि शिवसेनेचा जन्म कधी झाला. भाजपचा जन्म 1980च्या दशकात झाला. जनता पक्षाचं पतन झाल्यावर. शिवसेनेचा जन्म 1969 सालचा. शिवसेनेचा पहिला महापौर हेमचंद गुप्ते कधी झाले, त्यावेळी आमच्याकडे किती नगरसेवक होते या संदर्भातील एखादं अभ्यास शिबीर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये ठेवू आणि जर कोणाला त्याचा अस्वाद घ्यायचा असेल तर त्यांना येऊ द्या, असा टोलाही त्यांनी लगावला.
फडणवीसांच्या जन्माच्या आधी आमचे नगरसेवक
शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक हे त्याच काळात निवडून आले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर गिरगावात प्रमोद नवलकर आमचे आमदार म्हणून निवडून आले होते. माझगावातून आमचे छगन भुजबळ निवडून आले होते. भाजपच्या जन्माआधी आमचे वाघ मुंबईतून निवडून आलेले आहेत अनेकदा, असा टोला लगावतानाच देवेंद्र फडणवीसांचा तेव्हा मुंबईशी संबंध नसेल महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नसेल या सगळ्या गोष्टी श्री फडणवीसांच्या जन्माच्या आधीच्या आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.
संबंधित बातम्या:
मी काय आहे आणि कोण आहे हे सलमानला दाखवून देईन, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत बिचुकलेचा संताप