ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका बसणार? आमदार अपात्रतेच्या निकालाआधी शिवसेना नेत्याचा सर्वात मोठा दावा
शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकाल जाहीर होण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष आहे. या निकालाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात भेटदेखील झालीय. या सर्व घटनाक्रमावर शिवसेना नेत्याने मोठा दावा केलाय.
गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 9 जानेवारी 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्याचा दिवस सर्वात मोठा आणि ऐतिहासिक असणार आहे. कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर उद्या निकाल जाहीर करणार आहेत. या निकालात कुणाला दिलासा मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर फार काही राजकीय घडामोडी घडणार नाहीत. पण ठाकरे गटाला मोठा फटका बसेल. ठाकरे गटाचे आमदार अपात्र होतील. याउलट निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भव्य आणि अभूतपूर्व असा राजकीय भूकंप बघायला मिळेल. या सगळ्या घडामोडी कशा आणि काय-काय घडतील हे आगामी काळात स्पष्ट होईलच, पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाबाबत सर्वात मोठा दावा केला आहे. “येत्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिना हा ठाकरे गटाला ग्रहण असलेले महिना असतील. लोकभेपूर्वी बऱ्याचशा ईडीच्या धाड होतील”, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी केला.
ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांच्या घरावर आज सकाळी ईडीच्या धाडी पडल्या. ईडीच्या या कारवाईवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. “वायकर हा कार्यकर्ता आहे, त्यांचा बोलवता धनी कोण, साम्राज्य कुणाच्या आशीर्वादाने उभं झालं आहे? ईडीने 7 जणांवर छापे मारले, 7 जण कुणाशी संबंधितं आहेत ते पहावं लागेल. मोठे मासे सर्व मुंबईत आहेत. काहीजण फॉरेन दौरा करून येतात. काही लोकं कारवाईवर प्रतिक्रियासुद्धा देणार नाहीत. ज्यांनी ज्यांनी खाललं आहे, त्यांचं ईडी काढत आहे”, अशी प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी दिली.
मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या भेटीवर संजय शिरसाट म्हणाले…
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीचा आणि आमदार अपात्रतेच्या निर्णयाचा काही संबंध नाही. विधानसभा अध्यक्षांचा आवाका हा विधानसभेत असतो. पण त्यांचं वैयक्तिक कामं असतील तर 24 तास ते त्या भूमिकेत राहत नाहीत. मी त्यांना मैत्रीमध्ये नार्वेकर म्हणतो पण विधानसभेत अध्यक्ष म्हणतो”, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
‘ठाकरे गटाची उद्याची हार निश्चित’
“विधानसभा अध्यक्षांना कायद्याच्या चौकटीत निकाल द्यावा लागतो. निकालात राजकारण आणू नका, निकाल सुप्रीम कोर्टात जाणार आहे. आपली घटका भरत आली आहे. ठाकरे गट दोन दिवसात सुप्रीम कोर्टात दिसेल. त्यांची उद्याची हार निश्चित आहे. ते 15 आमदार वाचवण्यासाठी कोर्टात जातील. आम्ही पात्र झाल्यानंतर ठाकरे गट अपात्र होईल. विधानसभा अध्यक्षांना वेळकाढूपणा करायचा असता तर आणखीन वेळ काढता आला असता. सुनावणीच्या वेळेस ठाकरे गटाने वेळकाढूपणा केला”, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.