‘शरद पवार यांनी त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवला’, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना मणिपूरचा उल्लेख केला होता. यावरुन आता संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काही घडेल, अशी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी निशाणा साधला आहे. “शरद पवार यांच्या वक्तव्याचा जो अर्थ घ्यायचा तो घेतला. शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य हे महाराष्ट्राचं मणिपूर होईल असं आहे. दोन समाजातील निर्माण झालेल्या तेढवर त्यांनी असं वक्तव्य केलं आहे. जातीय दंगली पेटणार आहेत, असं भाकीत करणं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही. एका ज्येष्ठ नेत्याच्या तोंडून असे विचार निघाले तर राज्यात येणारी गुंतवणूक थांबते. पूर्वीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीने जातीजातीत भांडणं लावून आपलं राजकारण केलं आहे”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केला.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व राजकीय पक्षांना बोलवून मराठा आरक्षणाबाबत बैठक घेतली. ठाकरे गटाच्या नेत्यांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसच्या नेत्याने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. शरद पवार यांनी आरक्षणाबाबत गोलमोल भूमिका घेतली आहे. आरक्षणाला सरकार जबाबदार आहे. सरकारला फासावर लटकवले पाहिजे, अशा पद्धतीने राजकारण केलं जातं. शरद पवार यांनी काल त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवला आहे. एकीकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनातून बोलायचं, हाकेच्या आंदोलनाला फुस लावायची”, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला.
संजय शिरसाट यांचा शरद पवारांवर निशाणा
“शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर कधीच भूमिका जाहीर केली नाही. गेल्या 40 वर्षांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. पण काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने त्याची कधी दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा समाज व्यथित झाला होता. 40 वर्षानंतर शिंदे सरकार आल्यानंतर त्याची नक्कल घ्यायला सुरुवात झाली, याचा परिणाम म्हणून जुन्या कुणबी नोंदी सापडल्या. सरकार काही करत नाही हे त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसलं पाहिजे. त्यांना कावीळ झाला आहे”, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला.
संजय शिरसाट अनिल देशमुखांवर काय म्हणाले?
संजय शिरसाट यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोपांवरही टीका केली. “कायदेशीर प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक झाली होती. त्या प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप नव्हता. सरकारला सुडाचं राजकारण करायचं असतं तर अनिल देशमुख आज जेलमध्ये असते. अनिल देशमुख यांनी उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एवढ्या दिवसांनी अशा स्वरुपाचे आरोप करणे हा ढोंगीपणा आहे”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.