VIDEO: जसे तुमच्यासाठी मोदी, तसे आमच्यासाठी आदित्य ठाकरे, सुहास कांदे, सुनील प्रभू, भास्कर जाधव आक्रमक, नितेश राणे प्रकरण तापलं
नितेश राणे यांनी आमच्या नेत्यांचा अवमान केला आहे. आम्ही हा अवमान खपवून घेणार नाही. जसे तुमच्यासाठी मोदी आहेत. तसेच आमच्यासाठी आदित्य ठाकरे आहेत.
मुंबई: नितेश राणे यांनी आमच्या नेत्यांचा अवमान केला आहे. आम्ही हा अवमान खपवून घेणार नाही. जसे तुमच्यासाठी मोदी आहेत. तसेच आमच्यासाठी आदित्य ठाकरे आहेत. एक तर नितेश राणेंनी झाल्याप्रकाराबद्दल माफी मागावी अन्यथा त्यांना सभागृहातून निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना नेते सुहास कांदे, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांनी केली. नितेश राणेंना निलंबित करण्यासाठी शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घालत नितेश राणे हाय हायच्या घोषणा दिल्या. गोंधळ प्रचंड वाढल्याने सभागृहाचं कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आलं.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात येत असताना नितेश राणेंनी म्याव म्यावचा आवाज काढला होता. त्याचे आजही सभागृहात पडसाद उमटले. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज सभागृहात पॉइंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे नितेश राणे प्रकरणाकडे लक्ष वेधलं. आमच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंचा आम्ही आदर करतो. सुधीर भाऊ आपण फार बोलतात. मात्र, आपलसुद्धा ऐकलं जात नाही. अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करतो की सभागृहात किंवा सभागृहाच्या प्रांगणात आमच्या नेत्याविरोधात बोललं गेल्यास आम्ही शांत राहणार नाही. आमच्या नेत्याचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सुहास कांदे यांनी दिला. तसेच नितेश राणेंना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.
चुकीला माफी नाही
यावेळी सुनील प्रभू यांनीही नितेश राणे प्रकरणावरून विरोधकांवर हल्ला चढवला. त्या दिवशी मी हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हाही चर्चा झाली. तेव्हाही ठरलं नेत्यांबाबत नीट बोललं पाहिजे. चुकीला माफी नाही. त्यामुळे नितेश राणेंना निलंबित केलंच पाहिजे, अशी आक्रमक मागणी प्रभू यांनी केली.
कायमस्वरुपी निलंबित करा
हा विषय अत्यंत गंभीर आहे. एखाद्या नेत्याबद्दल असं बोलणं योग्य नाही. मी मोदींबद्दल बोललो. तेव्हा मी माफी मागितली. तुमच्यासाठी जसे मोदी आहेत. तसेच आमच्यासाठी आदित्य ठाकरे आहेत. त्यामुळे नितेश राणेंना कायमस्वरुपी निलंबित करा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. नितेश राणेंनी माझ्यावरही टीका केलीहोती. मागे मला बोलले होते की हा कुत्रा आहे. त्याला बिस्किट दिले तर चावायला जातो. अभिरुप सभागृहात बोलले होते नितेश राणे. त्यामुळे यांच्यावर कारवाई करून त्यांना चाप लावलाच पाहिजे, असं जाधव म्हणाले.
मी अध्यक्षांची परवानगी घेतलीय मला पुरेपूर बोलू द्या. मागच्या अधिवेशनावेळी मी तालिका अध्यक्ष होतो. त्यावेळी फडणवीस साहेब तुम्ही विधान भवनाबाहेर अभिरुप विधानसभा भरवली. त्यावेळी हेच सदस्य अनेक वक्तव्य करत होते. युट्यूबवर क्लिप आहे. माझ्याकडे क्लिप आहे. याच संधीची गेले कित्येक दिवस मी वाट पाहत होतो. नितेश राणेंनी दादांना उद्देशून म्हटलं, दादा मी इथे असंसदीय शब्द बोलतो. भास्कर जाधव म्हणजे काय? त्याला कुणी तरी सांगितली दोन बिस्किटं देतो, जा त्याला चाऊन ये. त्याला चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव. असं नितेश राणे त्या क्लिपमध्ये बोलले. सुधीरभाऊ तुम्ही त्या क्लिपमध्ये दिसत नाहीत, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.
सभागृहात गोंधळ
यावेळी भास्कर जाधव हातावर हात मारून जोरजोरात आपलं म्हणणं मांडत होते. त्याचवेळी विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनीही जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. हा गोंधळ अधिकच वाढल्याने अखेर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.
संबंधित बातम्या:
तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, विधानसभेत पुन्हा गदारोळ, जाधवांचे भाजपला खडे सवाल