Shiv Sena MLA Disqualification Case | विधानसभा अध्यक्षांनी बोलावली तातडीची सुनावणी, मुंबईत अतिमहत्त्वाच्या घडामोडींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी मुंबईत सुरु आहेत. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर मुबंईत मोठ्या हालचाली सुरु आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षांनी आज या प्रकरणी तातडीची सुनावणी बोलावली आहे. या सुनावणीला सुरुवात झालीय.
मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी बोलावली आहे. या सुनावणीला सुरुवात झालीय. या सुनावणीसाठी दोन्ही बाजूचे वकील उपस्थित आहेत. ठाकरे गटाकडून अनिल परब, अनिल देसाई, अजय चौधरी, सुनील प्रभू विधान भवनात दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष आज दोन्ही पक्षांच्या बाजू एकूण घेणार आहेत. याप्रकरणी 34 याचिका आहेत. या सर्व याचिकांवर पुढील काळात सुनावणी होणार आहे. या याचिकांचं वेळापत्रक काय असेल, ते आजच्या सुनावणीत ठरवलं जाण्याची शक्यता आहे.
या सुनावणीनंतर 34 याचिकांच्या सुनावणीचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. पण दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर वेळापत्रक जाहीर होणार आहे. विधीमंडळ ही स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या दबावाला बळी पडून, घाईने हा निर्णय घेणं योग्य नाही. दोन्ही बाजूचे मुद्दे ऐकून घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल. शेवटी प्रत्येकाला न्याय मिळायला हवा, अशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका आहे.
ठाकरे गटाच्या वकिलांचे अध्यक्षांना सवाल
राहुल नार्वेकर यांच्याकडून 34 याचिकांचं वेळापत्रक कशाप्रकारे लावलं जातं, तसेच सुरुवातीला दोन्ही गटाकडून काय युक्तिवाद केला जातो, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामत हे आजच्या सुनावणीवेळी बाजू मांडत आहेत, अशी माहिती मिळत आहे. पुढील सुनावणी कशी घेणार आहात? वेळापत्रक कसं असेल? किती वेळ लागेल? असे प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांनी अध्यक्षांना विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाकरे गटाचा अध्यक्षांवर विलंब लावल्याचा आरोप
ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांवर विलंबाचा आरोप करण्यात येतोय. ठाकरे गटाने याबाबत सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केलीय. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या सुनावणी वेळी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दोन आठवड्यांचा वेळ वाढवून दिला होता. पण आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राहुल नार्वेकर यांनी आज तातडीची सुनावणी बोलावली आहे.