Shiv Sena MLA Disqualification | ‘त्या’ मुद्द्यावरुन सुनील प्रभूंना घेरलं, दोन्ही गटाचे वकील आमनेसामने, नेमकं काय-काय घडलं?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांची फेरसाक्ष घेतली. यावेळी महेश जेठमलानी यांनी प्रभूंना घेरण्याचा प्रयत्न केला.
गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली. आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरील सुनावणीचा या आठवड्यातील दुसरा दिवस होता. राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सकाळी 11 वाजेपासून ही सुनावणी सुरु झाली. तसेच पुढचे काही दिवस शासकीय सुट्टी वगळता दररोज ही सुनावणी असणार आहे. पुढच्या 4 तारखेपर्यंत ही नियमित सुनावणी पार पडणार आहे. गेल्या सुनावणीवेळी (काल) ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्याचं काम सुरु झालं. तेच काम आजही सुनावणीत झालं. विशेष म्हणजे आजच्या सुनावणीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना घेरण्याचा प्रचंड प्रयत्न केला. यावेळी सुनील प्रभूंनी काही प्रश्नांवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. तर याच मुद्द्यावरुन महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात चांगलीच झुंपली. या युक्तिवादातील प्रश्न-उत्तरे समोर आली आहेत.
नेमके सवाल-जवाब काय?
सुनिल प्रभू : विधानसभेचा प्रतोद म्हणून मी व्हीप दिला होता.
जेठमलानी : 21 जून 2022 च्या पत्राकडे आपलं लक्ष वेधण्यात येत आहे. हे पत्र कुणाच्या अधिकारात देण्यात आल?
प्रभू : विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवायची होती. विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराचा पराभव झाला होता. काही आमदार ट्रेस होत नव्हते. संपर्कात नव्हते म्हणून हे पत्र देण्यात आले.
जेठमलानी : हे पत्र कुणाच्या अधिकारात देण्यात आलं?
सुनील प्रभू : विधिमंडळ सदस्य पक्षाची मीटिंग बोलवायची होती. विधानपरिषेच्या निवडणुकीत एका उमेदवाराचा पराभव झाला होता. काही आमदार ट्रेस होत नव्हते म्हणजे संपर्कात येत नव्हते. म्हणून विधानसभेच्या सदस्यांची बैठक बोलवावी आणि माहिती घ्यावी म्हणून प्रतोद म्हणून मी हा व्हीप दिला होता.
जेठमलानी : 21 जून 2022 रोजी व्हीप पत्र कोणाच्या अधिकार अंतर्गत दिले गेलं?
प्रभू : 21 जून रोजी मिटींग बोलावायची होती. विधान परिषद निवडणूक एका उमेदवार पराभव झाला, तसच काही आमदार संपर्कात नव्हते. विधीमंडळ सदस्य बैठक बोलवून याबाबत माहिती घ्यावी यासाठी प्रतोद म्हणून बैठकीचा व्हीप दिला होता.
प्रभू : पक्षाचा प्रतोद म्हणून मी बैठकीचा व्हीप बजावला होता.
जेठमलानी : आपण हा व्हीप स्वतःच्या अधिकारात काढला होता, अस म्हणणं योग्य ठरेल?
प्रभू : विधान परिषद निवडणुकीत झालेल्या मत विभाजनानंतर शिवसेना पक्षाचे काही आमदार मिसिंग होते. त्यामुळे ही बैठक पक्ष प्रमुखांच्या आदेशानुसार बोलवायला सांगितली होती आणि त्यामुळे प्रतोद म्हणून मी व्हीप बजावला.
जेठमलानी : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हीप बाबत लिखित स्वरुपात सूचना केल्या होत्या की मौखिक स्वरूपात ठाकरे सूचना केल्या?
प्रभू : अशा बैठका तातडीन बोलवल्या जातात. त्यावेळेस टेलिफोनिक आदेश दिले जातात.
जेठमलानी : पक्षप्रमुखांनी आपल्याला लिखित स्वरूपात सूचना दिली होती का?
प्रभू : मी याचं उत्तर माझ्या लेखी उत्तरात दिलं आहे.
जेठमलानी : तुम्ही असं गोलगोल बोलू नका थेट बोला.
(सुनील प्रभू यांनी जेठमलानी यांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. मी साक्ष देतोय आरोपी नाही.)
प्रभू : अशा बैठकांचे आदेश हे फोनवरून दिले जातात.
जेठमलानी : पक्षप्रमुखांनी ही बैठक बोलवण्याचे आदेश मोबाईलवर तुम्हाला दिले की landline वर दिले? तेव्हा तुम्ही कुठे होता?
प्रभू : मी विधीमंडळ पक्षाच्या कार्यालयात होतो. निकाल लागून तीन चार तास झाले होते. आमदार गायबच्या बातम्या येत होत्या. तेव्हा तातडीची बैठक बोलवा असा फोन होता.
महेश जेठमलानी : कोणत्या दिनांकाला निवडणुकीची मतमोजणी संपली?
प्रभू : मला तारीख नाही माहीत ती. पण ऑन रेकॉर्ड आहे. माझ्या माहितीनुसार व्हीप बजावला त्याचा आदल्या दिवशी म्हणजे 20 तारीखला मतमोजणी होती.
प्रभू : त्यादिवशी 8.30 वाजता रिकाऊंटींग संपली असे मला वाटते. रिकाऊंटिंगमुळे उशीर झाला.
जेठमलानी : तुम्हाला वेळ आठवते का?
प्रभू : काऊंटींगवेळी माझ्या पक्षातील आमदार होते. मतविभाजन कुठे झालं याचा शोध आम्ही शोध घेत होतो. कागदावर काही गोष्टी मांडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पार्टी ऑफिसमध्ये दीड तास गेला.
जेठमलानी : तुम्ही पूर्ण कथा सांगत आहात.
प्रभू : मला वेळ तर द्यावं लागेल ना.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर : मूळ प्रश्नाचा गाभा समजून उत्तर द्या. वेळ कमी आहे.
प्रभू : ठिक आहे प्रयत्न करतो.
जेठमलानी : स्पेसिफिक उत्तर द्या
प्रभू : उशीर का झाला ते सांगावं लागेल ना?
जेठमलानी : वेळ सांगा कृपया.
प्रभू : 10.30 किंवा 11.30 ची वेळ होती. पक्षप्रमुखांचा फोन आला. पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवा असे सांगण्यात आले, त्यानंतर व्हीप तयार केला.
जेठमलानी : प्रश्न छोटा आणि सोपा आहे. अशी उत्तरे चालणार नाहीत.
नार्वेकर : उत्तर स्पेसिफिक ठेवा. सुनिल प्रभू तुम्हाला हे पुन्हा सांगण्यात येत आहे.
प्रभू : मी सत्य सांगतोय. 21 जून 2022 ला फोन आला. त्यानंतर पार्टी ऑफिसमध्ये व्हीप तयार केला. मग जे संपर्कात येत होते त्यांना देण्याची सुरुवात केली. रात्री 12 वाजले होते.
जेठमलानी – तुम्ही म्हणताय की लिखित व्हीप 20 तारखेला दिला म्हणजे 20 तारखेला रात्री बजावला आहे. पण त्या व्हीपवर 21 जून तारीख नोंदवली आहे. हे खरं आहे का?
प्रभू – मी आधीच सांगितलं की व्हीप जारी केला तेव्हा रात्री साडे 11-12 वाजले होते. त्यामुळे मी व्हीपवर 21 जूनची तारीख टाकली. कारण 20 जून हा दिवस संपला होता. त्यामुळे 21 तारीख व्हीपवर टाकून तो बजावायला सुरुवात केली.
जेठमलानी – तुम्ही व्हीप बजावत होता म्हणजे कशाप्रकारे तो बजावला, तो कसा वाटप केला? कोणत्या प्रकारे वाटप केला?
प्रभू – माझ्यासोबत जे आमदार उपस्थित होते त्यांना तात्काळ दिला. जे आमदार निवासला होते त्यांना व्हीप पाठवून सुपूर्द केला. पण जे ट्रेस होत नव्हते त्यांना व्हाट्सअॅपवर पाठवण्याशिवाय पर्याय नव्हता.
जेठमलानी – व्हीप वाटप केले, कोणत्या प्रकारे सुरू केले ?
प्रभू – जे आमदार माझ्यासोबत विधानभवनात होते त्यांना तात्काळ दिले गेले. जे आमदार निवास येथे होते त्यांना व्हीप पाठवून दिले. पण जे आमदार संपर्कातच नव्हते त्यंना व्हाट्सअॅपवर व्हीप पाठवण्याशिवाय पर्याय नव्हता
जेठमलानी – आपल्या समवेत आमदार होते ते कोण होते?
प्रभू – ऑन रेकॉर्डवर आहे
जेठमलानी – ऑन रेकॉर्डवर आहे ते मी का शोधू? आता फेरसाक्ष सुरु आहेत.
विधानसभा अध्यक्ष – ऑन रेकॉर्डवर काय आहे ते जाणून घेण्यासाठी उलट तपासणी सुरु आहे. तुम्हाला उत्तरं त्याप्रमाणे द्यावे लागतील.
प्रभू – मला आता आठवत नाही. बरेच आमदार होते
जेठमलानी – (प्रभू यांच्या उत्तरवर जेठमलानी यांनी आक्षेप घेतला) प्रभू यांना प्रतिज्ञापत्र दाखवावे. प्रतिज्ञापत्रमध्ये आणि प्रभू यांच्या उत्तरात विरोधाभास आहे. (यावरून जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला)
जेठमलानी – आपण आपले प्रतिज्ञापत्र पाहा आणि त्यातील नावे दाखवा.
प्रभू – आता माझे म्हणणे असे आहे की, मी प्रश्न क्रमांक 38 चं उत्तरं देत असताना नावे माझ्या एफेडेव्हिटमध्ये दिले, असा उल्लेख केला होता. पण ती नावे मी जी अपात्रतेची याचिका दाखल केली होती त्याच्यात आहे, असं म्हणत आहे.
(प्रभू याना एफिडेव्हिट दाखवण्यात आले आणि त्यातील कोणती नवे आहेत ते सांगा असे सांगण्यात आलं)
विधानसभा अध्यक्ष – व्हीप कुणाच्या हातात दिला? कोणते आमदार होते ?
जेठमलानी – त्यांना प्रश्न समजला नाहीय.
विधानसभा अध्यक्ष – त्यांना प्रश्न समजत नसतील तर त्यांना ते समजावणं माझं काम आहे.
प्रभू – त्यांनी मला विचारलं की तुम्ही व्हीप दिला तर तेव्हा सोबत कोण होतं, व्हीप कुणाला दिला?
जेठमलानी – या प्रश्नाला काही अर्थ नाहीय.
विधानसभा अध्यक्ष – तुम्ही ज्या आमदारांना व्हीप बजावला त्यांची नावे कुठल्या पानावर आहेत?
प्रभू – मी पीटीशनमध्ये असं म्हटलं होतं की त्या आमदारांची नावे ११, १२, १३, १४ या पानांवर आहेत.
प्रभू – त्या आमदारांची नावे आहेत राहूल पाटील, ऊदय सिंह राजपूत, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, रविंद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश फातर्पेकर, अजय चौधरी, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभाव नाईक, संजय पोतनिस हे सगळे माझ्यासोबत होते. यांना व्हीप दिला. इतर आमदारांना सिस्टमप्रमाणे पाठवला.
जेठमलानी – आपण ज्यांना व्हीप दिला त्याची लेखी पोच आपल्याकडे आहे का?
प्रभू – ज्यांना प्रत्यक्ष व्हीप दिला त्याची लेखी पोच माझ्याकडे आहे..
जेठमलानी – 2022 मध्ये अशी प्रथा कार्यपद्धती होती का ज्यांनी व्हीप जारी केला तो घेऊ शकतो का?
प्रभू – कार्यपद्धती होती. ज्याने व्हीप जारी केलं तो विधिमंडळाचा सदस्य आहे, इतर आमदारांप्रमाणे त्याला पण नियम पाळावे लागतात. त्यामुळे ज्याने व्हीप जारी केला त्याने व्हीप घेणं क्रमप्राप्त होतं.
जेठमलानी – 20 जून 2022 रोजी आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण कथितरित्या पाठवलेल्या व्हीपची पोचपावती घेतली हे बारोबर आहे का?
प्रभू – मी घेतलेल्या व्हीपची पोचपावती द्यावीच लागते आणि ती मी दिली.
जेठमलानी – आपण ज्या व्हीपची पोचपावती दिली ती आपण स्वतः दिली कि इतर कोणी आमदारांना दिली?
प्रभू – व्हीपवर मी सही केल्यानंतर व्हीप देण्याचे काम प्रत्यक्ष त्या आमदारांना भेटून पार्टी ऑफिसचे कर्मचारी करतात
जेठमलानी – आपण जारी करता म्हणून व्हीपवर स्वाक्षरी केली. पण मी आपल्याला विचारू इच्छितो कि, आपण व्हीप स्वीकारल्यावर स्वाक्षरी केली का?
प्रभू – मी व्हीपवर सही केल्यावर पार्टी ऑफिसमध्ये काम करणारे जबाबदार कर्मचारी व्हीप आमदारांना पोचवतात आणि त्यांची सही घेतात. मी देखील पार्टी ऑफिसमध्ये नियमानुसार व्हीप स्वीकारला, आणि ज्या कर्मचाऱ्याने व्हीप स्वीकारल्याचे सहीचा कागद आणला त्यावर सही करून व्हीप स्वीकारला.