वकिलांच्या ‘त्या’ प्रश्नावर सुनील प्रभू निरुत्तर, ठाकरे गटाचं काय होणार?
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवली. यावेळी कागदपत्रांच्या मुद्द्यावरुन जेठमलानी यांनी काही प्रश्न विचारले. या प्रश्नांवर उत्तर देताना सुनील प्रभू निरुत्तर झाले. विशेष म्हणजे कालदेखील सुुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांकडे महेश जेठमलानी यांच्या प्रश्नांपासून आपलं संरक्षण व्हावं, अशी मागणी केली होती.
विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 23 नोव्हेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आज पार पडली. या सुनावणीच्या पहिल्या सत्रात आज पुन्हा एकदा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवली. महेश जेठमलानी यांनी आज पुन्हा एकदा व्हीपच्या मुद्द्यावरुन सुनील प्रभू यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जे आमदार संपर्कात नव्हते त्यांना आपण व्हाट्सअॅपच्या माध्यमातून व्हीप बजावला, असं सुनील प्रभू यांनी सांगितलं. आपल्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी व्हाट्सअॅपच्या माध्यमातून व्हीप बजावला, असं सुनील प्रभू यांनी जेठमलानी यांना उत्तर दिलं. व्हीपच्या काही प्रश्नांवरुन आज पुन्हा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात खडाजंगी झाली. विशेष म्हणजे आजच्या सुनावणीच्या अंतिम टप्प्यात महेश जेठमलानी यांनी अखेर सुनील प्रभू यांना प्रश्नांवर प्रश्न विचारुन निरुत्तर करुन सोडलं.
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी कागदपत्रावरील तारखेच्या मुद्द्यावरुन सुनील प्रभू यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांनी प्रभू यांची अखेर कोंडी करुन दाखवली. “सहपत्र पी २ च्या पहिल्या पानावर असलेले दिनांक कुणाच्या हस्ताक्षरात लिहिली आहे?”, असा प्रश्न महेश जेठमलानी यांनी विचारला. त्यावर प्रभू यांनी “कार्यालयीन कर्मचारी हे दिनांक टाकतात. पूर्ण कागद समोर आणतात. कुणाचे हस्ताक्षर आहे, हे मी कसे सांगू?”, असं उत्तर दिलं. त्यावर जेठमलानी यांनी आणखी एक प्रश्न विचारला. “सहपत्र पी २ ही मूळ प्रतची अचूक नक्कल आहे का?”, असं जेठमलानी यांनी विचारलं. त्यावर प्रभू यांनी नक्कल आहे असं स्पष्ट केलं.
“लक्षात नाही हे वाक्य रेकॉर्डवर घ्यावे”, प्रभूंचं वक्तव्य वकिलांनी पकडलं
“तुम्ही म्हटलं की तुम्ही जे काही याचिकेत लिहिले आहे ते तुम्हाला मराठीत समजावून सांगितलं आहे. मग आता तुमच्या याचिकेत पान क्रमांक १५वर पी २ ही मूळ कागदपत्रांची सांक्षाकित प्रत असल्याचे तुम्ही नमूद केले आहे, हे खरे आहे का?”, असा सवाल जेठमलानी यांनी केला. त्यावर प्रभू यांनी “आता एक ते दीड वर्ष झाले. कुठे लक्षात राहणार एवढं सगळं?”, असं प्रभू म्हणाले. सुनील प्रभू यांचं हे वक्तव्य जेठमलानी यांनी पकडलं. “लक्षात नाही हे वाक्य रेकॉर्डवर घ्यावे”, अशी विनंती जेठमलानी यांनी विधानसभा अध्यक्षांना केली.
“सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या मूळ व्हीपच्या कागदपत्रांमध्ये नमूद केलेली तारीख नक्कलच्या सांक्षाकित प्रतवर का दिसत नाही?”, असा प्रश्न महेश जेठमलानी यांनी विचारला. त्यावर सुनील प्रभू यांनी “दिनांक दिसत नाही, हे खरे आहे. पण प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. झेरॉक्समध्ये प्रिंटिंग मिस्टेक असू शकते”, असं स्पष्टीकरण दिलं. “मूळ प्रतीवरील तारीख झेरॉक्सवर का नाही?”, असा पुन्हा प्रश्न जेठमलानी यांनी केला. पण सुनील प्रभू यांना उत्तर देता आलं नाही. ते निरुत्तर झाले.