Tv9 EXCLUSIVE | विधानसभा अध्यक्षांसमोर ‘व्हीप’वरुन घमासान, दोन्ही गटाचे वकील आमनेसामने, जोरदार युक्तिवाद
Shiv Sena MLA Disqualification Case | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेच्या प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी व्हीपच्या मुद्द्यावरुन जोरदार घमासान बघायला मिळालं. ठाकरे गटाच्या वकिलांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाने जारी केलेलं व्हीपच घटनाबाह्य आहे, असा युक्तिवाद केला. यावेळी विधानसभा अध्यक्षांनीदेखील काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.
विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वकिलांनी गेल्या सुनावणीवेळी जोरदार युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत युक्तिवाद केला. या सुनावणीवेळी दोन्ही गटात पुरावे परत सादर करण्यावरुन चांगलंच घमासान झालं. ठाकरे गटाच्या वकिलांचा पुन्हा पुरावे सादर करण्यास विरोध आहे. पुरावे सादर करण्याच्या नावाने वेळेचा विलंब करणं, अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. ठाकरे गटाच्या वकिलांनी आज कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाचा व्हीप हा घटनाबाह्य आहे, असा युक्तिवाद केला.
ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आज पहिल्यांदा युक्तिवाद केला. “नव्याने पुरावे सादर करण्याची गरज नाही. गेल्या सुनावणीत आपण अर्ज दाखल केला होता”, असं देवदत्त कामत म्हणाले. त्यानंतर अध्यक्षांनी “मला मर्यादित वेळेत ही सुनावणी घ्यायची आहे”, असं वक्तव्य केलं. त्यानंतर दोन्ही गटाच्या वकिलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. “जे पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहेत, त्याला माझा विरोध नाही. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे सुनावणी घ्यावी”, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली.
ठाकरे गटाचे वकील नेमकं काय म्हणाले?
“25 सप्टेंबरच्या निर्णयानुसार पुरावे सादर करण्यास परवानगी मिळालीय. त्यानंतर २८ ऑक्टोबरला अर्ज दाखल केले. पण अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर व्हीपसंदर्भात प्रश्न निर्माण केला. शिंदे गटाने मेल मिळालाच नाही, असे सांगितले. गेल्यावेळी मी सांगितले की, पुरावे सादर करावेत, पण अद्याप अर्जावर सुनावणी सुरु आहे. जर मी पुरावे सादर करू नका म्हटले. तर मला सादर करण्यास मिळणार नाहीत. याउलट त्यांना परवानगी मिळू शकते. आम्हाला तेच म्हणायचे आहे. वर्षभरापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर आता ते नव्याने पुरावे सादर करण्यास परवानगी मागत आहेत”, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केला.
विधानसभा अध्यक्षांचं महत्त्वाचं वक्तव्य
विधानसभा अध्यक्षांनी यावेळी महत्त्वाची भूमिका मांडली. “दोन्ही गटाच्या सहमतीने पुरावे सादर करण्यास परवानगी देत आहोत. तसेच फेरसाक्ष घेण्याचा निर्णय घेत आहोत”, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले. दोन्ही गटाच्या वकिलांकडून सहमती देत अर्ज मंजुरी काढण्यात आले. वेळेची बचत करण्यासाठी दोन्ही गटांकडून मंजुरी देण्यात आली, असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
‘शिंदे गटाचा व्हीप घटनाबाह्य’, ठाकरे गटाचा युक्तिवाद
यानंतर दुसऱ्या अर्जावर सुनावणी सुरु झाली. ठाकरे गटाच्या वकिलांनी दुसरा अर्ज वाचून दाखवला. कागदपत्रे तपासणी संदर्भात ठाकरे गटाने अर्ज केलाय. त्यावर युक्तिवाद सुरु झाला. यावेळी ठाकरे गटाकडून व्हीप बजावण्यासंदर्भात युक्तिवाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा दाखला देत ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाचा व्हीप घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद केला.
‘पुरावे सादर करण्याची गरज आहे’, विधानसभा अध्यक्षांचं वक्तव्य
ठाकरे गटाच्या युक्तिवादावर विधानसभा अध्यक्षांनी भूमिका मांडली. “जर तुम्ही काही सादर केले आहे, तसेच दुसरा गट ते नाकारत आहे, याचा अर्थ यासंदर्भात पुरावे सादर करण्याची गरज आहे”, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
‘सर्वच आमदारांना व्हीप मिळालाय’, ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद
“एकनाथ शिंदे यांना मेलवर व्हीप मिळाल्याचा पुरावा आहे. शिंदे गटाने व्हिप मिळाल्याचे सांगितले ना, न मिळाल्याचे सांगितले. संबंधित ईमेल आयडी आपला नसल्याचे त्यांनी कधीही सांगितले नाही. शिंदे यांचा ईमेल आयडी चुकीचा नसल्याचं स्पष्ट दिसतंय. म्हणजे सर्वच आमदारांना व्हीप मिळाला”, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केला.
‘शिंदेंवर कायदेशीर कारवाई होऊ शकते’, ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद
“शिंदेंनी स्पष्ट म्हटलंय की, तो ईमेल आयडी त्यांचाच आहे. व्हीप मिळाला नाही हे सांगणं गंभीर आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आयटी तज्ज्ञांकडून ती माहिती मिळवायला हवी. संबंधित सर्व आमदारांना ईमेलद्वारे व्हिप दिला गेला आहे. ते नकार देत असतील तर मग त्यांनी आपले ईमेल आयडी नसल्याचे सांगावे आणि कोणता आहे ते सांगावे”, असा जोरदार युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केला.
“एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांचा मेल आयडी त्यांच्या ताब्यात नाही. तसेच त्यांचा मेल फिशिंग झालेला असू शकतो, याशिवाय 21 जणांच्या ईमेल आयडीवरही व्हीपचा मेल आला नाही असे ते सांगतात. तसे असेल तर त्याची खातरजमा आयटी तज्ज्ञांकडून करता येईल. मुळात विजय जोशी यांच्या ईमेल वरून एकनाथ शिंदे यांना व्हीप मेल वरून पाठवला होता”, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांनी केला.
यावेळी विधानसभा अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केले. “तुम्ही म्हणता ईमेल दिला आहे. पण ते म्हणतात तसं चुकीच्या ईमेलला जर ईमेल दिला असेल तर त्याला उत्तर काय?”, असा सवाल विधानसभा अध्यक्षांनी केला. “जर आम्ही व्हीप पाठवलेला ईमेल चुकीचा आहे तर बरोबर कुठला आहे? ते त्यांनी सांगावं. तसेच आयटी कायद्यानुसार ईमेल हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो”, असं ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत म्हणाले.
यावेळी देवदत्त कामत यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. “महेश शिंदे यांना स्पेशल ईमेल आयडी मिळाला आहे का? महेश शिंदे यांनी महेश शिंदे 003 असा मेल आयडी दिलाय. हा कुठला आयडी आहे?” अशी मिश्किल टिपण्णी ठाकरे गटाच्या वकिलांनी केली. “अध्यक्ष पदाच्या मतदानासाठी मविआकडून राजन साळवी यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. त्यावेळी साळवींना मत द्यावं यासाठी व्हिप जारी केला होता. त्यासाठी मेल पाठवला होता”, असं ठाकरे गटाच्या वकिलांनी सांगितलं.