मुंबई | 1 फेब्रुवारी 2024 : आमदार संजय गायकवाड यांची शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कल्याणचे शिवसेना कार्यकर्ते दुर्गेश बागूल यांच्यासोबत फोनवर बोलताना संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांना शिवीगाळ केली आहे. त्यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. संबंधित ऑडिओ क्लिपची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही. पण या ऑडिओ क्लिपमुळे नवा वाद निर्माण झालाय. विशेष म्हणजे सत्ताधारी दोन पक्षांमधील नेतेच एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. त्यामुळे महायुतीत चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलेलं बघायला मिळत आहे. या सर्व प्रकरणाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कसं हाताळतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुर्गेश बागूल : हॅलो…
संजय गायकवाड : हॅलो!
दुर्गेश बागूल : आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना हा…
संजय गायकवाड : कोण बोलतंय?
दुर्गेश बागूल : दुर्गेश बागूल बोलतोय…
संजय गायकवाड : कुठून?
दुर्गेश बागूल : कल्याण…
संजय गायकवाड : हा बोला…
दुर्गेश बागूल : साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं ते…
संजय गायकवाड : दिलं ना *** त्या भुजबळच्या… माज आलाय त्याला… त्याचं *** काय म्हणणं आहे तुह्यावाले…
दुर्गेश बागूल : साहेब, हे तुम्ही चुकीचे बोलताय… ऐका… हो साहेब… ऐका… आम्ही पण शिवसेनेचेच कार्यकर्ते… कळलं का?
संजय गायकवाड : ***** खानदानी ही खतम करतो **** मी…
संजय गायकवाड यांच्याकडून छगन भुजबळ यांच्यावर सध्या सडकून टीका केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा नेते मनोज जरांगे यांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य केल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनोज जरांगे यांच्या सगेसोयरेबाबतच्या मागण्यांवर भुजबळ यांनी आक्षेप घेतलाय. याच मुद्द्यावरुन संजय गायकवाड यांनी भुजबळांवर टीका केली. संजय गायकवाड यांनी काल मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांची आज जीभ घसरली. “मुख्यमंत्री भुजबळांच्या कंबरेत लाथ मारुन सरकारमधून हाकलून द्या”, असं गायकवाड म्हणाले. त्यांच्या या वादग्रस्त टीकांवर अजित पवार गटाकडूनही प्रतिक्रिया येत आहे.
संजय पाटील यांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय गायकवाड यांना अशी वक्तव्य करायला रोखलं पाहिजे. अन्यथा त्यांचे पाय उखडून टाकायला कार्यकर्ते खंबीर आहेत. छगन भुजबळ हे कशाला पाहिजे? तुम्हाला जशास तसं उत्तर मिळेल. तू आमदार तुझ्या घरी, बोलताना नीट बोललं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिलं पाहिजे. अन्यथा सत्तेतील कुस्ती लोकांना पाहायला मिळेल”, असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला. “जर संजय गायकवाड यांनी शिव्या दिल्या तर डबल शिव्या द्या”, असा सल्ला रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.