आतली गोष्ट बाहेर आली… राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार भाजपमुळे रखडला?, संजय शिरसाट यांचं मोठं विधान
म्हाडाची घर आमदार घेणार नाहीत. आमदारांना काही गरज नाही. मी म्हाडाची कान उघाडणी करणार आहोत, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं. आमदारांना म्हाडाची घरे मिळणार असल्याने त्यावरून वाद झाला आहे. त्यावर ते बोलत होते.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल दिल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चिन्हे दिसू लागल्याने युतीतील अनेक मंत्र्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. अनेकांनी मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरू केली आहे. जे इच्छूक आहेत, ते मंत्रिमंडळ विस्तार लवकर व्हावा असं वारंवार सांगत आहेत. या सर्व घडामोडी सुरू असतानाच मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युलाही समोर येत आहे. शिंदे गटाचे सात आणि भाजपचे सात आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील असं सांगितलं जात आहे. मात्र, तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये. मंत्रिमंडळाचं घोडं अडलंय कुठं? असा सवाल सर्वांनाच पडलेला असतानाच या संदर्भात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान करून खळबळ उडवून दिली आहे.
मत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. मंत्रिमंडळ विस्तारासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होतं आहे. याबाबत त्यांच्या अंतर्गत काय चालू आहे हे मला माहीत नाही. आमदाराच काय विस्तार व्हावा ही सर्व सामान्य नागरिकांची मागणी आहे, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
तेव्हाच पवारांना का सांगितलं नाही?
तडजोडीसाठी मला तुरुंगात ऑफर आली होती. ती स्वीकारली असती तर माझ्याविरोधात कारवाई झाली नसती, असं राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. त्यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशमुख यांनी त्याच वेळी शर पवारांना सांगायला हवं होतं. आता का बोलता? हा सायको प्रकार आहे. विनाकारण भाजपवर खापर फोडत आहेत, असं ते म्हणाले.
‘त्या’ प्रकरणाची चौकशी
वरळीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम न करता कोट्यवधीची बिलं काढली. ही बाब मी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत, असं शिरसाट सांगितलं.
संजय राऊत हा भोंगा
संजय राऊत हा दररोजचा भोंगा आहे. तो नालायक माणूस आहे. काय बोलायचं त्यांच्यावर? भाजपकडे सर्व यंत्रणा आहेत तरीही ते काही करत नाही. राऊत त्यावेळी म्हटले होते 10 जणचं उठाव करत आहेत. पण आम्ही छाती ठोकून गेलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मग काय बिघडलं?
नव्या संसदेच्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याला विरोधकांनी विरोध केला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या संसदेच्या इमारतीचं उद्गाटन करण्यात यावं असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मंत्रालयाचं उद्धाटन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केलं. मग संसदचं उद्घाटन मोदींनी केलं तर काय बिघडलं? विरोधक विनाकारण विरोध करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.