उमेदवारी नाकारल्यानंतर चार दिवस बेपत्ता, अखेर श्रीनिवास वनगा परतले, कुठे अन् का गेले होते सांगितले?
shrinivas vanga: आपला बळी कोणी घेतला, त्यांची नावे वनगा यांनी सांगितली. ते म्हणाले, जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये, राजेंद्र गावित यांनी माझा बळी घेतला आहे. साहेब त्यांच्यावर कारवाई करतील अशी खात्री आहे. मी प्रामाणिक राहून काम करेल.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांमध्ये ते होते. त्यातील 39 आमदारांनी पुन्हा तिकीट देण्यात आले. परंतु श्रीनिवास वनगा यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे नाराज झालेले श्रीनिवास वनगा 28 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. ते आता चार दिवसानंतर घरी परतले. ते कुठे गेले होते? का गेले होते? त्याची कारणे त्यांनी सांगितली.
श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर ते अज्ञातस्थळी गेले होते. त्यांना शिंदे गटाने पालघरमधून उमेदवारी नाकारली होती. चार दिवस बेपत्ता राहिल्यानंतर परतले. बॉडीगार्ड नव्हते. कुठे होते माहीत नव्हते. पण बुधवारी त्यांनी घरच्यांशी संपर्क केला होता. नातेवाईकांकडे असल्याचे त्यांनी सांगितलं होते.
कुठे गेले होते श्रीनिवास वनगा
मी दोन दिवस बाहेर होतो. मी नातेवाईकांकडे होतो. घराच्या आसपासच होतो. मला अपेक्षा होती पालघर किंवा डहाणूत उमेदवारी मिळेल. मी नाराज होतो. भावनेतून बोललो. मी ठाकरे गटाच्या संपर्कात नव्हतो. रागाच्या भरात मी नातेवाईकांकडे गेलो होतो, असे श्रीनिवास वनगा यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.
श्रीनिवास वनगा आता उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे का? त्यावर ते म्हणाले, मी सध्या कोणाला भेटणार नाही. माझी भूमिका काही नाही. फक्त शंभुराजेंशी मी बोललो. माझे तिकीट कापण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचले. मी प्रामाणिक होतो. माझा बळी घेणाऱ्यांवर शिंदे साहेबांनी कारवाई करावी, हीच माझी अपेक्षा आहे. शिंदे साहेब जे सांगतील ते मी करेल.
आपला बळी कोणी घेतला, त्यांची नावे वनगा यांनी सांगितली. ते म्हणाले, जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये, राजेंद्र गावित यांनी माझा बळी घेतला आहे. साहेब त्यांच्यावर कारवाई करतील अशी खात्री आहे. मी प्रामाणिक राहून काम करेल. कालपासून मुलाची तब्येत बरी नाही. प्रामाणिकतेचे राजकारणात काम नाही. मला माझ्या कुटुंबासाठी जगायचे आहे. राजकीय भूमिका काय घेणार? हे पुढे बघेन, असे ते म्हणाले.