‘आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील’, आमदाराचा रश्मी ठाकरे यांना शब्द
शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटाकडून आज आयोजित कार्यक्रमात आमदार सुनील शिंदे यांनी रश्नी ठाकरे यांना आदित्य ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री बनतील, असा शब्द दिला.
मुंबई : “युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील”, असा शब्द विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी आदित्य यांच्या आई रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना दिलाय. ठाकरे गटाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज वरळीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमात सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील, असं विधान केलं. “रश्मी वहिनी तुम्ही कार्यक्रमाला आलात. ही वरळी शिवसेनेची आहे. ही वरळी उद्धव ठाकरे यांची आहे. ही वरळी आदित्य ठाकरे यांचीच असेल. वहिनी मी तुम्हाला शब्द देतो की, आदित्य ठाकरे इथूनच मुख्यमंत्री होतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर याच मंचावर आम्ही त्यांचा सत्कार करु”, असं सुनील शिंदे म्हणाले.
या कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “अजून मंत्रिमंडळात एकही महिला नाही ही खंत आहे. टीव्हीवर मंत्र्यांकडून महिलांचा अपमान केला जातोय. महिलांना शिव्या देणारे देखील मंत्रिमंडळात आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.
“चार एअरपोर्टबद्दल पाठपुरावा करतोय. पालघरमध्ये विमानतळ, औरंगाबाद जवळ एक एअर फिल्ड असावं. तसेच पुण्यातील एअरपोर्टसंदर्भात क्लॅरिटी नाही. दुसरं होईल की नाही जे आहे त्याचं एक्सटेंशन होईल की नाही यासंदर्भात कळावं. सोबतच नाशिकच्या कनेक्टिव्हिटीच्या अडचणी आहेत. कधी फ्लाईट्स असतात कधी नाही. त्यामुळे कन्सिटन्सी त्यात असावी”, असं मत आदित्य ठाकरे यांनी मांडलं.
“आपण काल बघितलं असेल राज्याबाहेर फॉक्सकॉन कंपनी गेली. आताच्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात फक्त 40 खोके एकदम ओके किंवा 40 गद्दार एकदम ओके असं लिहिलं असतं तरी झालं असतं. महाराष्ट्र कुठेही ओके दिसत नाही. अवकाळीवर पंचनामांचे आदेश दिले. मात्र कारवाई होत नाही. उद्योग बाहेर जात आहेत. मुंबईताल रस्त्यांसाठी 1 किमीसाठी 15 कोटी वापरले जाणार आहे’, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“मुंबईकरांचा पैसा जपून वापरत होतो. हा पैसा आता त्यांच्या आवडत्या मित्रांमध्ये आणि कंत्राटदारांमध्ये वाटला जाणार आहे. शेतकरी हैराण आहे. आमच्यावेळी शेतकऱ्यांपर्यंत कर्जमुक्ती पोहोचली होती. आता फक्त गद्दार आनंदी आहेत, मला वाटतं ते पण नसेल कारण मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीय”, असा टोला त्यांनी लगावला.