BIG BREAKING | श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना, मोठं काहीतरी घडतंय?
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रीकांत यांचं दिल्लीला जाण्याच्या टायमिंगवरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेची आज सकाळी एक जाहिरात समोर आली. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अव्वल आहेत, असा दावा करण्यात आला आहे. तसेच ‘दिल्लीत मोदी तर महाराष्ट्रात शिंदे’, असं या जाहिरातीत म्हटलं आहे. या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षाही जास्त टक्क्यांचा कौल हा एकनाथ शिंदे यांच्याबाजूने असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी एका सर्व्हेचा दाखल देण्यात आला आहे. त्यानंतर आता वेगळ्या घडामोडी घडत आहेत.
शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीय. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तर उघडपणे शिवसेनेची जाहिरात ही चुकीची असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे आज कोल्हापूरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र जाणार होते. पण फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द झाला. शिवसेनेकडून या जाहिरातीवर कोणतीही नाराजी नाही, असं सांगण्यात येतंय.
“जाहिरात चुकीची असल्यास खुलासा करणार”
“विशेष म्हणजे या जाहिरातीशी शिवसेनेचा कोणताही संबंध नाही. कुणीतरी हितचिंतकाने ही जाहिरात दिली असेल”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. तर मंत्री दीपक केसरकर यांनी “जाहिरात चुकीची असल्यास खुलासा करणार”, असं म्हटलं आहे.
श्रीकांत शिंदे अचानक दिल्लीला रवाना
या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना श्रीकांत शिंदे आज अचानक दिल्लीला गेले आहेत. ते दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याची चर्चा आहे. श्रीकांत शिंदे अचानक दिल्लीला गेल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
श्रीकांत शिंदे हे मुंबईहून संध्याकाळी साडेसहा वाजता दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. श्रीकांत यांनी आपण वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला जात असून कोणत्याही नेत्यांना भेटणार नसल्याचं सांगितलं आहे. पण तरीही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
शिवसेना नेत्यांकडून युतीत सन्मान मिळत नसल्याची तक्रार?
शिवसेनेच्या नेत्यांची नुकतीच काल एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना आणि भाजपची आधी युती होती तेव्हा जसा मानसन्मान मिळत होता तसा सन्मान आता मिळत नसल्याची तक्रार काही आमदारांनी बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती, अशी बातमी समोर आली होती. त्यानंतर आज शिवसेनेची जाहिरात समोर आली.
कल्यामध्ये युतीत मोठा वाद, श्रीकांत यांनी व्यक्त केलेला संताप
विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात जो वाद झाला त्यावरुन त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. एका पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेला कल्याणमध्ये सहकार्य करायचं नाही, असा ठराव स्थानिक भाजप नेत्यांचा झाला होता. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांसमोर येत नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्या घडामोडींनंतर आता श्रीकांत शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत.