मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आज त्यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केलं. त्यानंतर शिवाजी पार्कवरील (shivaji park) ध्वजारोहणाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली. मुख्यमंत्री सक्रिय झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आजारी होते. त्यामुळे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत होते. या काळात विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. विरोधक मुख्यमंत्र्यांवर भावनाशून्यपणे टीका करत होते. ते कोणत्याही प्रकारच्या राजकीय नितिमत्तेला धरून नव्हते. विरोधकांच्या या नामर्दपणाला महाराष्ट्रातील जनतेनेच सडेतोड उत्तर दिलं आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी विरोधकांची चांगलीच पिसे काढली.
विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर घृणास्पद टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवर तोंडसुख घेत होते. त्यांच्या ऑपरेशनबाबत मानवताहीन टीका केली होती. पण मुख्यमंत्री आज समोर आले. उद्यापासून ते सर्व कामात सक्रिय होणार आहेत. राज्यातील विरोधी पक्ष भावनाशून्य होऊन मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका करत होता. हे कोणत्याही प्रकारच्या राजकीय नितीमत्तेला धरून नव्हतं. माणुसकीला धरून नव्हतं. मुख्यमंत्री आजारी आहेत, उपचार सुरू आहेत आणि तुम्ही अत्यंत नामर्दपणे मुख्यमंत्र्यावर टीका करत होता. या नामर्दपणाला आज महाराष्ट्रातील जनतेने उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एक दोन दिवसांपासून सक्रिय झाले. सकाळी वर्षावर ध्वज फडकवला. ते शिवतीर्थावर आले. दोन दिवसांपासून बैठका घेत आहेत. ज्यांनी मुख्यमंत्र्यांवर नामर्दपणाच्या कॉमेंटस केल्या त्यांना चपराक बसलीच आहे. पण त्यांच्या अंतरंगात किती घाण आणि कचरा आहे हे दिसून आलं, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
आजारपण कुणावर येईल आणि कोणत्या प्रकारचं येईल हे सांगता येत नाही. अटलबिहारी वाजपेयी अशाच गंभीर आजारातून गेले तेव्हा आम्ही त्यांची काळजी घेत होतो. शरद पवारही आजारी आहेत. होते. तेव्हाही आम्ही काळजीने त्यांची चौकशी करत होतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. मुख्यमंत्र्यांच दर्शन झालं त्यामुळे जनता खूश आहे. विरोधी पक्षाने नामर्दानगी आणली आहे. मोठ्या मनाचं राजकारण असतं त्याचा ऱ्हास विरोधकांकडून होत आहे. हे लोक अत्यंत कोत्या मनाचे आहेत. नामर्दानगी शब्द भाजपनेच आणला आहे. त्याबद्दल मी बोलत आहे, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून मी प्रार्थनाच करत होतो, या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटलांची प्रार्थना कोणत्या प्रकारची होती. त्यांचे शब्द काय होते हे तुम्ही सर्वांनी पाहिलचं असेल, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी पद्म पुरस्कारांवरून सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालमध्ये तीन प्रमुख लोकांना पुरस्कार दिला. पश्चिम बंगालच्या तिघांनीही पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. बुद्धदेव भट्टाचार्य हे फार मोठे नेते आहेत. डाव्या चळवळीतील प्रमुख नेते आहेत. त्यांनी पुरस्कार नाकारला. मुळात पुरस्कार देताना अनेकांना विचारलं नसावं. उठसूठ अनेकदा कुणालाही पुरस्कार दिले जात आहेत. विचारलं जात नाही. अनेकांना मरणोत्तर पुरस्कार दिले जात आहेत. जिवंतपणी पुरस्कार देत नाही. जिवंत असताना त्यांच्यावर टीका टिप्पणी केली जाते. हे लोकं हयात असताना त्यांना पुरस्कार का दिला नाही. मरणोत्तर पुरस्कार देण्याची प्रथा आणि पायंडे थांबले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्र भूषण मरणोत्तर द्यायचं नाही असं आम्ही ठरवलं. सावरकरांना पुरस्कार देतील असं वाटलं होतं. पण ते पुरस्कारापासून वंचितच आहेत. का हो फडणवीसजी बाळासाहेब ठाकरेंना एखादा पद्म पुरस्कार द्यावा असं तुमच्या सरकारला का वाटलं नाही. भारतरत्नचं नंतर पाहू. जे केवळ बाळासाहेबांच्या जयंतीवर ट्विट करतात त्यांनी पुरस्कार का दिला नाही? पद्मविभूषण किंवा भारत रत्न पुरस्कार का द्यावासा वाटला नाही? याचा खुलासा करावा. म्हणजे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ट्विट बाबत बोलता येईल, असा चिमटा त्यांनी काढला.
संबंधित बातम्या:
नेताजी, उत्तराखंड, मणिपूर की रावत? प्रजासत्ताक सोहळ्यात मोदींच्या टोपी आणि गमछाची देशभर चर्चा
Cidco Lottery : सिडकोकडून तळोजा येथील 5730 घरांसाठी लॉटरी जाहीर, एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं आवाहन