Sanjay Raut: तुम्ही विश्वाचे सर्वात मोठे नेते, दाऊद तर मच्छर, आणा त्याला फरफटत; राऊतांचं भाजपला आव्हान
Sanjay Raut: दाऊदला फरफटत आणलं पाहिजे. पाकिस्तानात जाऊन दाऊदची गचांडी पकडली पाहिजे. तो मोठा गुन्हेगार आहे ना? मग त्याला आणावं. मूळात दाऊद जिवंत आहे की मेला ते सांगावं?
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांचे दाऊद गँगच्या लोकांशी संबंध असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपला फटकारलं आहे. तुमचं केंद्रात सरकार आहे. तुम्ही विश्वाचे सर्वात मोठे नेते आहात. महान नेता आहात. तुमच्यासमोर दाऊद (dawood ibrahim) मच्छर आहे. आणा ना दाऊदला फरफटत. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनचा खात्मा केला. मग तुम्हीही घुसा पाकिस्तानात. दाऊक नेमका काय करतो, तो जिवंत आहे का? हे तुम्हालाच माहीत आहे. त्यामुळे आणा दाऊदला फरफटत. वाट कुणाची बघता, असं संजय राऊत म्हणाले. तसेच नवाब मलिकांबाबत कोर्टाने काय म्हटलं ते नीट समजून घ्या. त्यात प्रायमाफेसिया असा शब्द नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच राज्यात सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. सभा कोणीही घेऊ शकतो. महाराष्ट्राला सभेची परंपरा आहे, असं सांगत राऊत यांनी राज यांच्या सभेवर भाष्य करण्यास नकार दिला.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. दाऊदला फरफटत आणलं पाहिजे. पाकिस्तानात जाऊन दाऊदची गचांडी पकडली पाहिजे. तो मोठा गुन्हेगार आहे ना? मग त्याला आणावं. मूळात दाऊद जिवंत आहे की मेला ते सांगावं? गेल्या चाळीस वर्षापासून दाऊद दाऊद सुरू आहे. सर्वांच्या तोंडात एकच नाव आहे… दाऊद… दाऊद… दाऊद काय करतो हे केंद्रालाच माहीत आहे.अमेरिकेने लादेनबाबत जे केलं तेच करावं. तुम्ही ईश्वराचे सर्वात मोठे नेते आहात. महान आहात. दाऊद मच्छर आहे तुमच्यापुढे. आणा ना त्याला फरफटत, असं राऊत म्हणाले.
पाटलांची माहिती कमी
यावेळी त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटलांवरही टीका केली. बाळासाहेबांचे विचार शिल्लक आहेत म्हणून महाराष्ट्रात सरकार सुरू आहे. आम्ही वाजपेयी आणि अडवाणी यांचं ऐकत होतो. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठेच नव्हते. अटलजींचे आदेश आणि मार्गदर्शन आम्ही घेत होतो. पवारांचं मार्गदर्शन पंतप्रधान नेहमीच घेतात. चंद्रकांत पाटलांची माहिती कमी आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
हा राज्य सरकारचा विषय नाही
पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. केंद्राने दर कमी केले, ते वाढवले होते माहीत आहे ना? 15 रुपये वाढवायचे आणि 9 रुपये कमी करायचे हे सुरू आहे. दर कमी करणे ही केंद्राची जबाबदारी आहे. हा राज्य सरकारचा विषय नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात काय चाललं हे तुम्हाला माहीत आहे. केंद्र सरकारनेच कमी करावं. सर्वात आधी जीएसटीचा परतावा द्यावा. हजारो कोटी रुपयांची रक्कम आहे. म्हणजे आम्हालाही ताकद मिळेल काही करण्यासाठी. विरोधी पक्षनेते यावर का बोलत नाही? ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यावर त्यांनी बोलावं. महाराष्ट्राचा फायदा होईल, असं सांगतानाच राज्य सरकारची जबाबदारी सरकार पार पाडेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.