ठाकरे गट म्हणाला, ते प्रकल्प आमचेच, पण ‘सामना’त मात्र, त्याच प्रकल्पांची मोदी यांच्या फोटोसह जाहिरात; चर्चा तर होणारच

| Updated on: Jan 18, 2023 | 7:12 AM

सामनातील जाहिरातीतून तेच प्रकल्प आम्ही पूर्ण केल्याचा दावा भाजप आणि शिंदे गटाने केला आहे. असं असतानाही ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रात ती जाहिरात छापल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ठाकरे गट म्हणाला, ते प्रकल्प आमचेच, पण सामनात मात्र, त्याच प्रकल्पांची मोदी यांच्या फोटोसह जाहिरात; चर्चा तर होणारच
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरुवारी मुंबईत येत आहेत. मुंबईतील विविध विकास कामांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीचं रणशिंगही या दौऱ्यातून फुंकलं जाणार आहे, असं सांगितलं जातं. ठाकरे गटानेही मोदींचा हा दौरा निव्वळ राजकीय असल्याचं म्हटलं असून महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा दौरा होत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मोदींच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची पानभर जाहिरात छापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मोदींच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या ठाकरे गटाने मोदींच्या कार्यक्रमाची जाहिरात स्वीकारली तरी कशी अशी चर्चा आता रंगली आहे.

आजच्या दैनिक सामनातील पहिल्या पानावरच ही पानभर जाहिरात छापण्यात आली आहे. या जाहिरातीत मोदी कोणकोणत्या विकास कामांचं लोकार्पण करणार, कोणत्या कामाचं भूमिपूजन करणार आणि लाभ वितरणाची माहितीही देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

निर्धार सरकारचा…

या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भला मोठा फोटो छापण्यात आला आहे. त्यासोबत मेट्रोसह इतर विकास कामांचे फोटोही दाखण्यात आले आहेत. मोदींच्या फोटोच्यावर मुंबईच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असं हेडिंग दिलं आहे. त्यानंतर निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा असं घोषवाक्यही लिहिलं आहे. याच जाहिरातीत मोदी कोणकोणत्या विकास कामांचं भूमिपूजन करणार आहे त्याची माहिती दिली आहे.

लाभ वितरण

• प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज वितरण, 2 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना याचा लाभ होणार

भूमिपूजन

• 17,182 कोटींचे 7 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे भूमिपूजन (वरळी, वांद्रे, वर्सोवा, धारावी, मालाड, भांडुप, घाटकोपर) प्रतिदिन क्षमता : 2464 दशलक्ष लिटर. यामुळे 80% लोकसंख्येला लाभ होणार

• बृहन्मुंबई महापालिकेच्या 3 रुग्णालयांचे 9,108 कोटी खर्चासह बांधकाम व पुनर्विकास (गोरेगाव, भांडुप, ओशिवरा) यामुळे 25 लाख गरजूंना लाभ होणार

• 6.076 कोटी खर्चासह 400 कि.मी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त होणार

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाचा 2,813 कोटी खर्चासह पुनर्विकास, वारसा वास्तूचे जतन, पार्किंगसाठी जागा आणि इमारती हरित प्रमाणित होणार

लोकार्पण

• मेट्रो मार्गिका 2 अ (दहिसर पूर्व डी. एन. नगर) 16,410 कोटी खर्चासह 18.6 कि.मी मार्गिका आणि 17 स्थानके

• मैट्रो मार्गिका ७ (अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व) 16,208 कोटी खर्चासह 16.5 कि.मी. मार्गिका आणि 13 स्थानके

• बृहन्मुंबई मनपाच्या 20 नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे लोकार्पण, मोफत औषधे, वैद्यकीय तपासण्या, मोफत 147 रक्त चाचण्या, विविध डॉक्टरांचा मोफत सल्ला

वेळ, तारीख आणि स्थळ

त्यानंतर शेवटी या जाहिरातीत कार्यक्रमाची वेळ आणि तारीख देण्यात आली आहे. गुरुवार, 19 जानेवारी वेळ : दुपारी 4 वा, एमएमआरडीए मैदान, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई येथेही सभा होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांचा फोटो

सर्वात शेवटी जाहिरातीच्या तळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला आहे. आमच्याच विकास कामांचे, आम्ही तयार केलेल्या प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.

मात्र, सामनातील जाहिरातीतून तेच प्रकल्प आम्ही पूर्ण केल्याचा दावा भाजप आणि शिंदे गटाने केला आहे. असं असतानाही ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रात ती जाहिरात छापल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.