करारा जवाब की हूल?, कुणाची होणार पोलखोल?, ‘झुकेगा नही’ची पोस्टरबाजी; सेना भवनाबाहेर भव्य स्टेज, एलईडी स्क्रीन
शिवसेनेची (shivsena) आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ही शिवसेनेची पत्रकार परिषद असणार आहे. संजय राऊतांची नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
मुंबई: शिवसेनेची (shivsena) आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ही शिवसेनेची पत्रकार परिषद असणार आहे. संजय राऊतांची नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच भाजपचे साडेतीन नेते लवकरच तुरुंगात जातील, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद होणार असल्याने या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. शिवसेना भवनाच्या (shivsena bhavan) आत पत्रकारांच्या आसनाची व्यवस्था केली आहे. सेना भवनाच्या बाहेर भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. तसेच एलईडी स्क्रीनही लावण्यात आल्या आहेत. शिवाय झुकेगा नही, अशी पोस्टरबाजीही सेना भवनाच्या बाहेर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आज विरोधकांना करारा जवाब देणार की ही पत्रकार परिषद नुसती हूल ठरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत यांनी ही शिवसेनेची पत्रकार परिषद असेल असं स्पष्ट केलं आहे. शिवसेना बोलेल आणि देश ऐकेल, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राऊत कोणता बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदारांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय तयारी?
शिवसेना भवनातील भव्य हॉलमध्ये पत्रकार परिषदेची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल 100हून अधिक खुर्च्या पत्रकारांना बसण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. मंत्री, खासदार आणि आमदारांना बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिवसेना भवनाबाहेर पदाधिकारी आणि सैनिकांची मोठी गर्दी होणार असल्याने सेना भवनाबाहेर मोठा स्टेज उभारण्यात आला आहे. तसेच पत्रकार परिषद लाईव्ह पाहता यावी म्हणून एलईडी स्क्रीनही उभारण्यात आला आहे.
पोलिसांचा बंदोबस्त
या पत्रकार परिषदेवेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिवसेना भवन आणि आसपासच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
नाशिकहून शिवसैनिक मुंबईकडे रवाना
शिवसेनेच्या पत्रकार परिषदेसाठी औरंगाबाद आणि नाशिकहून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. त्यानिमित्ताने शिवसेना भव्य शक्तीप्रदर्शन करणार असल्याचंही दिसून येत आहे.
ते साडे तीन नेते कोण?
संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन लोकं तुरुंगात असतील असं म्हटलं होतं. आज ते या नेत्यांची नावे जाहीर करणार आहेत. तसेच त्यांच्या संबंधातील पोलखोलही करणार आहेत. पण हे साडेतीन नेते महाराष्ट्रातील आहेत की केंद्रातील यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवाय हे साडेतीन नेते आघाडीला त्रास देणाऱ्या नेत्यांपैकीच आहेत का? असा सवालही केला जात आहे.
संबंधित बातम्या:
सौ सोनार की एक लोहार की; पत्रकार परिषदेपूर्वीच संजय राऊतांचा सूचक इशारा
Nashik Election | सुरगाण्यात चिठ्ठीच्या बळावर शिवसेनेची डरकाळी; 3 ठिकाणचे नगराध्यक्ष बिनविरोध