Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोर आमदार रात्री आठवाजता मुंबईत होणार दाखल; उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना शांततेचं आवाहन
बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर भाजपाच्या वरच्या फळीतील नेत्यांसोबत त्यांची बैठक असणार आहे. तर विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून त्याला हे सर्व आमदार हजर राहणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

पणजी/मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार (शिंदे गट) (Rebel MLAs) गोव्याहून आज रात्री 8 वाजता मुंबईत दाखल होणार आहेत. गोव्याहून त्यांना मुंबईतील ताज प्रेसिडेंसी हॉटेलमध्ये नेण्यात येणार आहे. उद्या सकाळी आठ वाजता भाजपाच्या (BJP) पहिल्या फळीतील नेत्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर विधानभवनात यांना एकत्र नेण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता खबरदारी घेण्यात येत आहे. साधारणपणे शिंदे गटाचे हे आमदार साडे चारच्या सुमारास गोव्यातील ताज हॉटेलमधून बाहेर पडणार आहेत. पोलीस बंदोबस्तात या सर्व आमदारांना विमानतळापर्यंत नेले जाणार आहे. आमदारांच्या बसमधूनच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विमानतळापर्यंत जाण्याची शक्यता आहे. यासर्व पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनादेखील अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत.
उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केले होते शांततेचे आवाहन
ज्या ताज हॉटेलमधून शिंदे गटाचे आमदार बाहेर पडणार आहेत, तेथे हालचाली वाढल्या आहेत. हे सर्व बंडखोर आमदार तब्बल 11 दिवसांनंतर मुंबईत परतणार आहेत. त्यामुळे पोलिसांसह भाजपाही अलर्ट मोडवर आहे. या बंडखोर आमदारांविषयी शिवसैनिकांच्या मनात प्रचंड रोष आणि संताप आहे. त्यामुळे कोणता अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्व जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. बंडखोरांना मुंबईत येवू द्या. कोणताही विरोध, निदर्शने करू नका, असे शिवसैनिकांना सांगितले होते. त्यामुळे आता शिवसैनिकांची भूमिका काय असेल, हेही महत्त्वाचे आहे.



शिवसेना-शिंदे गट आमनेसामने
बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर भाजपाच्या वरच्या फळीतील नेत्यांसोबत त्यांची बैठक असणार आहे. तर विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून त्याला हे सर्व आमदार हजर राहणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. एकीकडे शिवसेना पक्षाच्या नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना काढले आहे. त्यासोबतच 16 आमदारांच्या निलंबनाचा विषय या सर्व बाबी न्यायालयात गेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.