Shiv Sena | BREAKING | उद्धव ठाकरे यांना खूप मोठा झटका, बडा नेता शिंदे गटात जाणार
शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटातील आणखी एक मोठा नेता शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसणार असल्याचं मानलं जात आहे.
मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटाला एकामागे एक धक्के बसत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह दिलंय. त्यामुळे शिंदे यांचाच पक्ष हा अधिकृत शिवसेना असल्याचं कागदोपत्री स्पष्ट झालंय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील माणसं त्यांना पाठ दाखवत आहेत. मुंबई, नाशिकमधील अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठ दाखवत एकनाथ शिंदे यांचा हात पकडला आहे.
दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे दिग्गज नेते सुभाष देसाई यांच्या पोटच्या मुलाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला वारंवार खिंडार पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाला धक्का देणारी घटना आज सुद्धा समोर आली आहे. ठाकरे गटाचे बडे नेते, जे एकेकाळी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री होते. त्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दीपक सावंत शिंदे गटात का जात आहेत?
दीपक सावंत हे राज्याचे माजी आरोग्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही अधिकृत शिवसेना आहे. हे माणून ते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या तीन ते चार दिवसांमधला हा ठाकरे गटासाठी दुसरा मोठा झटका मानला जातोय. नुकतंच ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता डॉ. दीपक सावंत हे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. बाळासाहेब भवन इथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होतोय.
दोन पक्षांमध्ये नेते एकमेकांकडे ओढण्याची स्पर्धा बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे दीपक सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी विधान भवनात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली होती. मंत्रिपदाची जबाबदारी संपल्यानंतर आणि विधान परिषदेतलं त्यांचा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर दीपक सावंत हे पक्षात बाजूला पडले होते. त्यामुळे त्यांच्या मनात याचबाबत उद्विग्नता असावी, अशी चर्चा आहे. ते आज अखेर शिंदे यांच्यासोबत जात आहेत. शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
सुप्रीम कोर्टात आज ठाकरे गटाला काहीसा दिलासा
दरम्यान, या सगळ्या घडामोडींदरम्यान ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीत दिलासा मिळाल्याचं बघायला मिळालं. सुप्रीम कोर्टात आज तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका मांडणारे वकील तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. यावेळी सरन्यायाधीश यांनी राज्यपालांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ठाकरे गटाला हा दिलासा मानला जातोय.