‘….तर विरोधी पक्ष मागे राहणार नाही’, कोल्हापूरच्या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाची सर्वात मोलाची प्रतिक्रिया
कोल्हापुरात जे काही घडलं त्यावर आता ठाकरे गटाची भूमिका समोर आली आहे. ठाकरे गटाची सध्याच्या परिस्थितीत भूमिका महत्त्वाची आहे. कारण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यात जर दंगलीसदृश्य परिस्थिती निर्माण होत असेल तर ती निवाळण्यासाठी विरोधी पक्षही मागे राहणार नाही, असं आश्वासन ठाकरे गटाकडून देण्यात आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्राचा अवाढव्य आणि अद्भूत असा इतिहास आहे. या महाराष्ट्राची पुरोगामी अशी ख्याती आहे. या महाराष्ट्रात अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. या महापुरुषांनी जगाला दिशा दाखवली. पण आज महाराष्ट्रात एवढ्या तेवढ्या कारणांवरुन काही अनपेक्षित अशा घटना घडत आहेत. या घटनांमागचा सूत्रधार कोण आहे? याचा पोलीस आणि सरकार तपास करत आहेत. पण या घटनांवर विरोधी पक्षातील महत्त्वाचा घटक असलेल्या ठाकरे गटाची भूमिका नेमकी काय? हे महत्त्वाचं आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर प्रतिक्रिया दिलीय.
“गेल्या 10 महिन्यांपासून हे सुरु आहे. विशेष म्हणजे वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. अशा वातावरणात महाराष्ट्रात राहिलं तर महाराष्ट्राचा विकास थांबू शकतो. कारण जे गुंतवणूकदार महाराष्ट्रात उद्योग आणू इच्छितात ते आणणार नाहीत. लोकांचं जिथे लक्ष असलं पाहिजे तिथून हटून दुसरीकडे जात आहे”, असं अनिल परब यांनी सांगितलं.
‘दंगलींना रोखायचं असेल तर विरोधी पक्ष मागे राहणार नाही’
“या परिस्थितीत दंगलींना रोखायचं असेल तर विरोधी पक्ष मागे राहणार नाही. विरोधी पक्ष नक्की पुढे येईल. पण या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे व्हायला पाहिजे. जे या सगळ्याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक शिक्षा व्हायला हवी”, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली.
“या घटनेमागे सूत्रधार कोण आहेत ते शोधले पाहिजेत. जाणूनबुजून असं केलं जातंय का ते शोधलं पाहिजे. जाणूनबुजून असं करत असतील तर त्याची कारणं काय ती शोधली पाहिजे. याला कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का ते शोधलं पाहिजे”, असं अनिल परब म्हणाले.
‘पोलिसांनी दबावाखाली चौकशी करु नये’
“पोलिसांनी आपलं काम चोखपणे केलं पाहिजे. कुठल्याही दबावाखाली याची चौकशी होता कामा नये. पोलिसांनी या प्रकरणात योग्य तपास करावा. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर शिक्षा करण्यात यावी”, अशी मागणी अनिल परब यांनी केली.
निवडणुका लावण्यासाठी अशाप्रकारच्या घटना घडत आहेत का? असा प्रश्न यावेळी अनिल परब यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया दिली. “खरंतर दोन्ही बाजूने शक्यता आहे. निवडणूक घ्यायला टाळत आहेत. त्याचबरोबर वातावरण असं खराब होत आहे. त्यामुळे कदाचित निवडणुका लावूही शकतात”, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.