VIDEO | …आणि ‘रिक्षावाला’ शब्दावरुन अरविंद सावंत यांचा यू-टर्न, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
खासदार अरविंद सावंत यांनी एक वक्तव्य केलं आणि शिवसेना आक्रमक झाली. ठाण्यातील रिक्षावाले आक्रमक झाले. विशेष म्हणजे सावंत यांनी आपल्या वक्तव्यात शरद पवार यांचाही उल्लेख केला. पण त्यांच्या वक्तव्यावर त्यांना पुढे स्पष्टीकरण देण्याची वेळही आली.
मुंबई : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) स्थापनेवेळचा एक किस्सा काल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सांगितला. एकनाथ शिंदेंच्या नावाला शरद पवारांनी कसा विरोध केला, हे सावंत यांनी सांगितलं. पण ते सांगताना त्यांनी शिंदेंचा रिक्षावाला असा उल्लेख केला. त्याच वाक्यावरुन आता सावंतांना यू-टर्नही घ्यावा लागलाय. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्या एका वाक्यामुळं खळबळ उडालीय. अरविंद सावंत यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळचा एक प्रसंग सांगितला आणि तो प्रसंग सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचाही दाखला दिला.
महाविकास आघाडीची स्थापना झाल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण ते मुख्यमंत्री होण्याआधी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या. अरविंद सावंतांच्या दाव्यानुसार, मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव पुढे केलं. पण पवारांनी ते नाव नाकारलं. काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाणांसारखे माजी मुख्यमंत्री राहिलेले नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते होते. एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणं या नेत्यांना शक्य झालं नसतं. त्यामुळं तुम्हीच मुख्यमंत्री व्हावं अशी गळ शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना घातली आणि त्यानंतरच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं अरविंद सावंतांनी सांगितलंय.
पण हे सांगताना अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख रिक्षावाला असा केला. त्यामुळे शरद पवारच एकनाथ शिंदेंना रिक्षावाला असं म्हणाले होते की काय? असा प्रश्न सर्वांना पडला. भाजप आणि शिंदे गटानं यावर आक्षेप घेतला. “हा श्रम शक्तीचा अपमान आहे. रिक्षावाला सरकार चालवू शकत नाही? सामान्य घरातील माणसं राज्य चालवतात हे त्यांना (शरद पवारांना) बघवत नाही”, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले.
मंत्री शंभूराज देसाई यांनीदेखील या मुद्द्यावरुन टीका केली. “महाविकास आघाडी काळात मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानावर पक्षप्रमुखांनी किती ऐकायचं? शरद पवार काय बोलले ते अरविंद सावंत यांनाच माहीत. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पवारांना माझ्या पक्षाचा निर्णय मी ठरवीन, असं म्हणायला हवं होतं. हे आम्हा 56 आमदारांना त्यावेळी सांगायला हवं होतं”, असं शभूराज देसाई म्हणाले.
नाशिकमध्ये अरविंद सावंत यांच्या या वक्तव्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. सावंत यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. शिवसेनेत बंड झाल्यावर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख रिक्षावाला असा केला होता. पण पवारांचं नाव घेत अरविंद सावंतांनी केलेल्या वक्तव्यामुळं खळबळ उडाली. आणि त्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळही सावंत यांच्यावरच आली.