BREAKING | ठाकरे गटाने अचानक राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ मागितली, पडद्यामागे काय घडतंय?
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सूचना दिल्या आहेत. या प्रकरणावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. तर दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. या घडामोडींदरम्यान ठाकरे गटाने अचानक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहित भेटीची वेळ मागितली आहे.
मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अनेक घडामोडी घडत आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. काही ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात खासदारांनी द्रौपदी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं आहे. मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीय करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, अशी मागणी विनायक राऊत यांनी पत्राद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केलंय.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
“मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि खासदारांचं शिष्टमंडळ खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात आपली भेट घेऊ इच्छित आहेत. आम्ही येत्या 5 आणि 6 नोव्हेंबरला सर्वजण आपली भेट घेऊ इच्छित आहोत. त्यामुळे आपल्या सोयीनुसार आम्हाला वेळ देण्याची कृपा करावी”, अशी विनंती विनायक राऊत यांनी पत्रात केलीय.
या पत्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊ इच्छित शिष्टमंडळाची नावे देखील सांगण्यात आली आहेत. यामध्ये खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील प्रभू यांच्या नावांचा समावेश आहे. या पत्रानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठाकरे गटाला वेळ देतात का? किंवा ते मराठा आणि धनगर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी सूचना देतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.