मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : मुंबई महापालिकेकडून 9 दिवसांपूर्वी सिनेट निवडणूक जाहीर करण्यात आलेली. ही निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. कारण राज्यातील सत्तांतरानंतर मुंबईतील ही मोठी निवडणूक आहे. जवळपास 95 हजार तरुण मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं कुणाच्या बाजूने मतदान होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं. या निवडणुकीसाठी आज अर्ज सादर करण्याचा आज शेवटचा दिवस होता. पण अचानक अर्ज सादर करण्याच्या एक दिवस आधी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने परिपत्रक जारी करत निवडणुकीला स्थगिती दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ठाकरे गटाचे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयावरुन थेट भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
विशेष म्हणजे सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आली असली तरीही ठाकरे गटाच्या युवासेनेकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुंबई विद्यापीठाने हे उमेदवारी अर्ज स्वीकारले आहेत. युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांच्यासोबत काही कार्यकर्ते मुंबई विद्यापीठात निवडणुकीला का स्थगिती दिली? याचा जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. वरुण सरदेसाई यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवासेनेने संपूर्ण दहा जागांवर आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आम्ही काल ऑनलाईन आणि आज ऑफलाईन असं आम्ही आमच्या युवासेनेचं संपूर्ण पॅनल उभं केलेलं आहे” , असं वरुण सरदेसाई यांनी सांगितलं.
“गेल्यावेळी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही 10 पैकी 10 जागांवर जिंकलो. यावेळी सुद्धा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या युवासेनेचं पॅनलल लढेल आणि परत एखदा सर्व जागा आम्ही जिंकू”, असं वरुण सरदेसाई म्हणाले.
“आमच्या सर्व उमेदवारांचे अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत. हे कसे केले आणि का केले? याबाबतचे प्रश्न आपण विद्यापीठाला विचारावेत. आमचं काम हे आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणं होतं. ते आम्ही केलेलं आहे. आम्हाला अपेक्षित आहे की, येत्या 10 सप्टेंबरला निवडणुका होतील. आम्हाला खात्री आहे की वेळापत्रकनुसारच निवडणुका होतील. त्या कधीही झाल्या तरी आम्ही दहाच्या जागा जिंकू”, असं वरुण सरदेसाई म्हणाले.
“विद्यापीठाने काल रात्री साडेअकरा वाजता परिपत्रक काढलं आणि निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याचं जाहीर केलं. आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे प्रश्न मांडले. तेच प्रश्न घेऊन आम्ही विद्यापीठात आलो. विद्यापीठात आलो तेव्हा विद्यापीठ कमी आणि हाय सेक्युरिटी केंद्र जास्त वाटत होतं. विद्यापीठाला छावणीचं स्वरुप आलेलं होतं. शेकडो पोलीस उभे केले गेले”, असं वरुण सरदेसाई म्हणाले.
“विद्यापीठाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत आमची सलग दोन तास चर्चा झाली. त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की, भाजपची विद्यार्थी आघाडी आणि आमदार आशिष शेलार यांनी एक छोटसं पत्र दिलं. या पत्रामध्ये त्यांनी काही नावांमध्ये दुबार नोंदणी झालीय, असं सांगितलं. त्या एका पत्रावरुन अभाविप आणि भाजप या दोघांच्या पत्रावर एका मिनिटात या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली”, असा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला.
“मतदार नोंदणी प्रक्रिया ऑनलाई झाली होती. जवळपास तीन ते साडे तीन महिने ही प्रक्रिया सुरु होती. त्यावेळेला काही सदस्य ही नोंदणी ऑफलाईन देखील व्हावी यासाठी कोर्टात गेले होते. कोर्टात विद्यापीठाने प्रतिज्ञापत्र सादर करत सांगितलं होतं ती, ऑनलाईन प्रक्रिया ही फुलप्रूफ आहे. यामध्ये कुठेही दुबार नोंदणी किंवा चूक होऊ शकत नाही, असं विद्यापीठाने कोर्टाने सांगितलं”, अशी माहिती वरुण सरदेसाई यांनी दिली.
“मतदान नोंदणीच्या साडेतीन महिन्यांच्या प्रक्रियेनंतर यादी जाहीर करण्यात आली. या यादीत ज्या मतदारांची नावे वगळण्यात आले आहेत त्यांना परत एकदा अर्ज करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली. त्यानंतर कुलगुरुंकडे देखील अपील देण्याची मुदत देण्यात आली. विद्यापीठाने सहा महिने घेऊन अंतिम मतदार यादी जाहीर केली. त्यानंतर विद्यापीठाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला”, असं सरदेसाई म्हणाले.
“निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पहिले पाच दिवस अर्ज सादर करण्याच्या वेळत कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही. पण शेवटच्या दिवशी रात्री उशिरा परिपत्रक काढण्यात आलं. त्यावर विद्यापीठाने सुद्धा आम्हाला हमी दिलीय की, त्यांची अंतिम मतदार यादी ही पारदर्शक आहे. त्यावर ते शासनाला उत्तर देतील. हा शासनाचा आणि मुंबई विद्यापीठाचा प्रश्न आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारु”, अशी भूमिका वरुण सरदेसाई यांनी मांडली.