अजित पवार यांनी गुडघे टेकले अन् पळून गेले…संजय राऊत यांचा घणाघात
Sanjay Raut: मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, फडणवीस असतील झुकले असतील. पण उद्धव ठाकरे, शरद पवार, रोहित पवार, संजय राऊत असे अनेक लोक गुडघे टेकणार नाही. फडणवीस यांनी सांगावं रोहित पवार भाजपमध्ये या आम्ही कारवाया थांबवतो.
गणेश थोरात, मुंबई | दि. 9 मार्च 2024 : ईडीकडून आमदार रोहित पवार यांच्यावर जी कारवाई सुरू आहे, तशी अजित पवार यांच्यावर देखील झाली. परंतु त्यांनी गुडघे टेकले आणि तेभाजपमध्ये पळून गेले. प्रफुल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली. इकबाल मिरची यांच्याशी संबंध असल्याचे पुरावे ईडीने त्यांना दाखवले. त्यानंतर ते ही भाजपमध्ये गेले. मग त्यांचावरील कारवाई थांबली. पुढे हसन मुश्रीफ यांच्यावर अन् त्यानंतर अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळावरील कारवाई थांबली. पण अनिल देशमुख, रोहित पवार आणि मी तसेच अन्य काही लोक आहेत झुकले नाही. कोणापुढे नतमस्तक झालो नाही. त्यांच्या पायाशी बसायला तयार झालो नाहीत. कारण आम्ही स्वाभिमानी मराठी आहोत, असा टोला शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.
रोहित पवार यांचा छळ
रोहित पवार यांच्यावर सातत्याने तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. त्यांचा छळ केला जात आहे. त्यांच्या कुटुंबियांचा छळ केला जात आहे. त्यांना वारंवार तपासासाठी बोलावलं जात आहे. रोहित पवार यांनी असा काय गुन्हा केला आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. उद्योग आणि व्यवहारात लहान सहान गोष्टी मागेपुढे झाल्या असतील. त्याच्यासाठी धडाधड धाडी टाकून त्यांची प्रॉपर्टी जप्त करणे, त्यांना बदनाम करणे कितपत योग्य आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय सुडापोटी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार झुकणार नाही
रोहित पवार यांनी भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मोगल शाहीपुढे ते झुकणार नाही. दिल्लीतील लोकांकडून महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे महाराष्ट्राचे उद्योग पळण्याचे उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आम्ही झुकणार नाहीच
इतर सगळे लोक गप्प बसले असतील. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, फडणवीस असतील झुकले असतील. पण उद्धव ठाकरे, शरद पवार, रोहित पवार, संजय राऊत असे अनेक लोक गुडघे टेकणार नाही. फडणवीस यांनी सांगावं रोहित पवार भाजपमध्ये या आम्ही कारवाया थांबवतो. परंतु रोहित पवार कुठे जाणार नाहीत. ते आजोबांबरोबर ठाम राहतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. आमच्यासारखे स्वाभिमानी लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत, तोपर्यंत तुमची महाराष्ट्र तोडण्याची, मुंबई गिळण्याची, मराठी माणसाला अपमानित करण्याची, महाराष्ट्राला कमजोर करण्याची इच्छा पूर्ण होणार नाही.
हे ही वाचा
ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, सोशल मीडियातून अशी मांडली सविस्तर भूमिका