कोकणात शिवसेना ठाकरे गटात ठिणगी, शिवसेनेच्या बड्या नेत्याविरोधात माजी तालुका प्रमुखाने दंड थोपटले
Shiv Sena ubt: भास्कर जाधव यांच्या उद्याच्या आभार कार्यक्रमावर संदीप सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. रात्रंदिवस फिरून आम्ही काम केले, आम्ही तुम्हाला लीड दिला, तुम्ही वेळ दिला असता तर आणखी लीड मिळाला असता, असे संदीप सावंत यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत कोकणात शिवसेना उबाठाला यश मिळू शकले नाही. इतर ठिकाणी दमदार कामगिरी करणाऱ्या शिवसेना उबाठाला कोकणातील लोकांनी साथ दिली नाही. त्याला महत्वाचे कारण शिवसेना उबाठामध्ये पक्षातंर्गत असलेल्या कुरघोडी होती. आता कोकणातील शिवसेनेचे बडे नेते भास्कर जाधव यांच्याविरोधात माजी तालुका प्रमुखाने दंड थोपटले आहे. संदीप सावंत यांना तालुकाप्रमुख पदावरून तडकाफडकी बाजूला केल्यामुळे ते संतप्त झाले आहे. त्यानंतर संदीप सावंत यांनी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्यावरती हल्लाबोल केला आहे.
काय म्हणतात संदीप सावंत
लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव मतदार संघातल्या फक्त एका गावातच दिसले. आता मात्र, आभाराचे नाटक करण्यासाठी येत आहे. हे नाटक कशासाठी? असा सवाल शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुख संदीप सांवत यांनी भास्कर जाधव यांना विचारला आहे. माझे काय चुकले याचे उत्तर द्या, नाहीतर ‘करारा जवाब मिलेगा…’, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
कोण आहेत संदीप सावंत
संदीप सावंत हे चिपळूण गुहागर विधानसभा मतदार संघाचे तालुकाप्रमुख आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संघटनात्मक केलेल्या फेरबदलावर नाराज झालेल्या संदीप सावंत यांनी भास्कर जाधव यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मी सुनील तटकरे यांच्याकडून दहा कोटी मागून दोन कोटी घेतले म्हणून मला बाजूला केले का? संदीप सावंत यांनी अप्रत्यक्षपणे भास्कर जाधव यांच्यावर आरोप केला आहे. माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाहीत तर मतदार संघात तुम्हाला लोकांना उत्तर द्यावे लागणार आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. अन्याय होत असेल तर शांत बसू नका, हे बाळासाहेबांनी शिकवले आहे. त्यामुळे मी शांत बसणार नाही, असे संदीप सावंत यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमावर घेतला आक्षेप
भास्कर जाधव यांच्या उद्याच्या आभार कार्यक्रमावर संदीप सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. रात्रंदिवस फिरून आम्ही काम केले, आम्ही तुम्हाला लीड दिला, तुम्ही वेळ दिला असता तर आणखी लीड मिळाला असता, असे संदीप सावंत यांनी म्हटले आहे.