शिवसेना ‘उबाठा’मध्ये घराणेशाही, कार्यकारणीत कार्यकर्त्यांना नव्हे तर नेत्यांच्या मुलांना संधी
ShivSean | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युवासेनेची कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तीमध्ये नेत्यांच्या मुलांना संधी मिळाली आहे. यामुळे कार्यकर्त्यांना अजून पदाधिकारी होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
निवृत्ती बाबर, मुंबई | दि. 29 फेब्रुवारी 2024 : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाले. उद्धव ठाकरे यांनी नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह घेतले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल चिन्ह घेऊन त्यांनी संघटनात्मक बांधणी करण्यास सुरुवात केली. अनेक जिल्ह्यात नवीन पदाधिकारी नियुक्त केले. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युवासेनेची कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तीमध्ये नेत्यांच्या मुलांना संधी मिळाली आहे. यामुळे कार्यकर्त्यांना अजून पदाधिकारी होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
कोणत्या नेत्यांच्या मुलांना मिळाली संधी
युवासेना कार्यकारणीमध्ये शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांच्या मुलीस संधी मिळाली आहे. राजन विचारे यांची मुलगी धनश्री विचारे युवा सेनेच्या कार्यकारणीत गेली आहे. शिवसेनेचे आणखी एक खासदार आणि नेते विनायक राऊत यांची मुलगीही कार्यकारणीत आली आहे. रुची राऊत युवा सेनेची पदाधिकारी बनली आहे. तसेच आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदे यांना युवा सेनेच्या कार्यकारणीत संधी देण्यात आली आहे.
रोशनी शिंदे यांना युवासेनेचे सहसचिवपद
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून ठाण्यात मारहाण झालेनंतर रोशनी शिंदे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यांना युवासेनेच सहसचिव पद देण्यात आले आहे. तसेच जय सरपोतदार, अभिषेक शिर्के, योगेश निमसे, दीपक दातीर, सिद्धेश शिंदे, रायन मेनेझेस, अश्विनी पवार, अॅड. गुरशीन साहनी, रुची राऊत, प्रियंका जोशी, दीक्षा संखे-कारकर, धनश्री विचारे यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपसचिवपदी हेमंत दुधवडकर, रणजित कदम, प्रथमेश सकपाळ, गीता कदम यांची तर सहसचिवपदी रोशनी शिंदे नियुक्ती केली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे ही माहिती कळवण्यात आली आहे.
शिवसेनेच्या कार्यकारणीत नेत्यांच्या मुलांवर जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे घराणेशाहीची चर्चा सुरु झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या युवा सेनेची भूमिका महत्वाची ठरणार आहे. प्रचाराच्या रणनीतीत युवा सेना किती ताकद लावले, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.