ठाकरे गट सर्वात मोठा राजकीय गेम खेळण्याच्या तयारीत? अनिल देसाई मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना का भेटले?
ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नेमकं काय घडतंय? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळ हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फार महत्त्वाचा आहे, असे संकेत मिळताना दिसत आहेत.
ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. अनिल देसाई यांच्या भेटीला राजकीय महत्त्व आहे. राज्यात नुकतंच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे. शेवटच्या टप्प्यांत मुंबईतील 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण भिवंडी, नाशिक, पालघर, दिंडोरी, धुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडली. यानंतर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. मुंबईत मतदानाच्या दिवशी खूप संत गतीने मतदान झालं. त्यामुळे अनेकांना मतदान करता आलं नाही. रांगेत उभे असलेले नागरीक कंटाळून मतदान न करता घरी निघून गेली, असा दावा ठाकरे गटाचा आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशीच पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते. यानंतर आज अनिल देसाई यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी असलेली व्यवस्था अत्यंत ढिसाळ होती. मतदान संथ गतीने का होत होतं? ही यंत्रणा एवढी ढिसाळ का होती? कारण त्यांना ज्या आयडेंटी प्रूफ म्हणून मागितले होते ते पाहून मतदारांना सरळसरळ हाकललं जात होतं. काही ठिकाणी आतमधला पोलिंग स्टाफ एवढा धजावला होता की, पोलिंग स्टाफ सांगत होता कुठे मतदान करा. काय चाललंय काय? ही काय मुघलाई आहे का? किंवा अशाप्रकारचं स्वच्छ आणि फार देशामधील मोठी लोकशाही असलेल्या देशात, तेही महाराष्ट्र सारख्या राज्यात व्हावं हे खरोखर अनपेक्षित आहे”, असं अनिल देसाई म्हणाले.
अनिल देसाई यांचा निवडणूक आयोगाला सवाल
“जिथे मशालला जास्त मतदान होणार होतं तिथे अशाप्रकारे झालंच. पण ही व्यवस्था चोख असणं आणि राबवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. तेच कर्तव्य ते राबवत नसतील तर मग आज लोकशाहीचा उत्सव आहे हे म्हणणं फोल आहे. काही ठिकाणी हस्तक्षेप होण्याचा प्रकार घडला”, असा दावा अनिल देसाई यांनी केला. “निवडणुकीसाठी ड्युटीवर आलेल्या लोकांना कोणत्याच प्रकारची सोय करण्यात आली नाही. अगदी ती लोकं उघड्यावर झोपली. तशी छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध झाले. ही हालअपेष्टा का? हा उत्सव तुम्ही म्हणता मग असा विरोधाभास का?”, असा सवाल अनिल देसाई यांनी केला.
“मतदानाला किती वेळ लागतो? एका बूथमध्ये एकावेळी तीन ते तार मतदार जाऊ शकतात. त्यांची पडताळणी वेगवेगळ्या ठिकाणी होते, शेवटी बोटाला शाई लागते, लगेचच्या लगेच तुम्ही मतदान कक्षामध्ये जातात, तोपर्यंत दुसऱ्या मतदारांची एकेका टप्प्याने छानणी होत असते. या गोष्टी होतच नव्हत्या. एक माणूस आतमध्ये गेला तो येत नाही तोपर्यंत दुसरा माणूस जात नव्हता. अतिशय ढिसाळ व्यवस्था होती”, अशी टीका अनिल देसाई यांनी केली.
“देशात एवढी बेरोजगारांची समस्या आहे. मग तुम्ही या निवडणुकीसाठी तुम्ही बेरोजगारांना ट्रेनिंग देवून निवडणुकीच्या कामांसाठी एक मोठा संच बनवा, जे तुम्हाला फक्त लोकसभा निवडणुका नाहीत तर बाकी येणाऱ्या निवडणुकांसाठीदेखील उपयोगाचे ठरतील”, असं अनिल देसाई म्हणाले.