दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीनंतरच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं सत्तांतर घडून आलेलं बघायला मिळालं. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशीच रात्री सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांसह सुरतच्या दिशेला रवाना झाले होते. यानंतर पुढे ते गुवाहाटीला गेले होते. या घडामोडनंतर राज्यात सत्तांतर घडून आलेलं. विशेष म्हणजे योगायोग असा आहे की, विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीने 9 उमेदवार घोषित केले आहेत. तर मविआच्या तीनही पक्षांकडून प्रत्येकी 3 उमेदवार देण्यात आले आहेत. महायुतीने एक उमेदवार जास्त घोषित केलाय. त्यामुळे या निवडणुकीच चुरस वाढली आहे. याच निवडणुकीवरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केला आहे.
“तुम्हाला माहिती असेल की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. खेला होबे होवू शकतो”, असं भाकीत सुषमा अंधारे यांनी वर्तवलं. “भाजपमध्ये पण काही आमदार नाराज असू शकतात”, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. “आमचे तीन उमेदवार निवडून येतील”, असंदेखील सुषमा अंधारे म्हणाले. सुषमा अंधारे यांनी वर्तवलेल्या या भाकीताला लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पार्श्वभूमी आणि भविष्यातली विधानसभा निवडणुकीचा किनार आहे. त्यामुळे त्यांच्या याबाबतच्या वक्तव्याला जास्त महत्त्व आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्याची विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. विधीमंडळाचं सध्या शेवटचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात शिंदे सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. विशेष म्हणजे महिलांसाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. या माध्यमातून महायुती सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घर करण्याता प्रयत्न करत आहे. लोकसभेत बसलेला फटका विधानसभेत पुन्हा बसू नये, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीदेखील विधानसभेत महायुतीचा मजबुतीने सामना करण्यासाठी रणनीती आखत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय-काय घडतं? याबाबतची उत्सुकता जास्त आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर पाच दिवसांच्या करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवरही प्रतिक्रिया दिली. “सत्ताधाऱ्यांनी ठरवून अंबादास दानवे यांच्यावर ही कारवाई केली आहे. सभापती महोदयांनी हे ठरवून केलं आहे. सभापती निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे त्यांना दाखवायचं असेल की आपण विरोधी पक्षनेत्यांची विकेट घेतली. सभापतींनी अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर काय अॅक्शन घेतली? आमदार प्रसाद लाड यांच्यासारखी लोक लाडावून ठेवली आहेत. ते अंगुलीनिर्देश करुन बोलले, संसदीय विषय राज्याच्या सभागृहात का?” असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.