उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का, अतिशय जवळचा आमदार शिंदेंचं शिवबंधन हाती बांधणार
ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांचा आज रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. कारण रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत.
गिरीश गायकवाड, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 10 मार्च 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठे राजकीय बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपकडून त्यांना राज्यसभेच्या खासदारकीचं बक्षीस देण्यात आलं आहे. त्यानंतर आता मुंबईत मोठा राजकीय खेळ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आज रात्री ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. वायकर यांच्याविरोधात ईडीकडून जोरदार कारवाई करण्यात आली आहे. रवींद्र वायकर यांची अनेकदा ईडी चौकशीदेखील झाली आहे. रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण आता हेच निकटवर्तीय शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज रात्री रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. खात्रीलायक सूत्रांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशाची वर्षा बंगल्यावर जोरदार तयारी सुरु झाली आहे. वायकर यांचा आज रात्री आठ वाजेनंतर वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी वायकर नेमकं काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राऊतांनी वायकरांबद्दल आधीच दिलेत संकेत
रवींद्र वायकर यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्याने ते पक्षाला सोडचिठ्ठी देतील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा याबाबत वक्तव्य केलं होतं. रवींद्र वायकर यांना प्रचंड त्रास दिला जातोय. त्यामुळे त्यांचा आता शिंदे गटात पक्षप्रवेश केला जाऊ शकतो, असे संकेत संजय राऊतांनी दिले होते. त्यानंतर अखेर आज रवींद्र वायकर खरंच शिंदे गटात पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी ठाकरे गटासाठी हा मोठा झटका आहे. रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशाची जंगी तयारी केली जात आहे. जवळपास दीड हजार जण त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘लागा किती मागे लागायचं आहे ते’, ठाकरेंचा निशाणा
रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशाच्या एक दिवस आधीच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. जे गद्दार असतील ते निघून जातील, जे खुद्दार असतील ते राहतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच “लागा किती मागे लागायचं आहे ते, रवींद्र वायकरांच्या मागे लागले आहेत, अनिल परबांच्या मागे लागले आहेत. किती मागे लागायचं आहे ते लागा. पण जोपर्यंत हा शिवसैनिक जिवंत आहे, त्याने हातात घेतलेली मशाल ही धगधगती आहे, तोपर्यंत तुमचे मनसुबे आम्ही महाराष्ट्रात यशस्वी होऊ देणार नाही. तुमचा सगळा भ्रष्ट आणि हुकूमशाहीचा कारभार हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. हा मला विश्वास आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.